
Water Supply : सिन्नरकरांना दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा होणार
सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या कडवा धरण स्त्रोत पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाच्या धामणगाव
उपकेंद्रातून होणारा पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिन्नर नगर परिषद प्रशासनाला पूर्व नियोजनानुसार एक दिवसाआड ४५ मिनिटे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. (Sinnar water supply for one hour every two days nashik news)
त्यामुळे दिवसाआड ४५ मिनिटांऐवजी आता दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता दसरे यांनी दिली. सिन्नर नगर परिषद एक दिवसाआड ४५ मिनिटे पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहेच, तथापि वीज वितरण कंपनीकडील तांत्रिक अडचणीमुळे कडवा धरणाच्या उद्भवाजवळील वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यास प्रशासनावर एक दिवसाआड ४५ मिनिटे पाणीपुरवठा करण्यावर मर्यादा येणार आहेत.
अशा परिस्थितीत नाइलाजस्तव शहरवासीयांना दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा करण्याची प्रशासनावर वेळ येऊ शकते. त्यासाठी प्रशासनातर्फे नागरिकांना निर्धारित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे जास्त वेळ पाणीपुरवठा करण्यात येईलच.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
तथापि नागरिकांनीही या गोष्टीचे गांभीर्य ओळखून त्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असेल, तेव्हा यानंतरचा पुढील पाणीपुरवठा विजेच्या समस्येमुळे आता दोन दिवसांआड होऊ शकतो, हेही गृहीत धरावे.
त्यानुसार पुढील दोन दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवावा व तो पुढच्या पाण्याच्या रोटेशनपर्यंत जतन करून ठेवावा, असे आवाहन दसरे यांनी केले. वीजपुरवठा सुरळीत झाल्यास एक दिवसाआड ४५ मिनिटे पाणीपुरवठा करण्याचा सिन्नर नगर परिषद प्रशासनाचा प्रयत्न असेल, अशी ग्वाहीही दसरे यांनी दिली आहे.