
रसवंतीचा गोडवा हरपला! लॉकडाउनमुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
अंबासन (जि. नाशिक) : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो असे नाही, तर कसमादे परिसरातील शेकाडो रसवंतीचालकांसह शीतगृहचालकांनाही बसला आहे. यामुळे बहुतांश व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उन्हाळा मध्यावर येऊन ठेपला असतानाही रसवंतिगृह चालकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
जसजशी उन्हाच्या तीव्रतेत वाढ होऊ लागते तसतसे गावोगावच्या शीतपेय व रसवंतिगृहांना सुगीचे दिवस येतात, हा आजवरचा इतिहास आहे. सर्वसामान्यांचे शीतपेय, अशी ओळख निर्माण झालेल्या व आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या उसाच्या ताज्या रसाला सर्वत्र विषेश मागणी असते. उन्हामुळे शरीराची झीज भरून काढण्यासाठी व शरीराला थंडावा निर्माण करण्यासाठी शीतगृहांकडे गर्दी होत असते. मात्र, या वर्षी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संसर्गामुळे कसमादे परिसरातील रसवंतिगृहासह शीतगृह ओस पडल्याचे चित्र आहे. ‘शीतपेय नको रे बाबा’, असाच काहीसा सूर ग्राहकांमध्ये आहे. चला थंड घेऊ या म्हणणारे ग्राहक थंड घेण्याचे टाळून गरमागरम चहाला पसंती देताना दिसून येत आहेत. उसाच्या रसाला ग्राहकांची मागणी नसल्यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी आपल्या रसवंतिगृहाला टाळे लावले आहे. ग्रामीण भागात व रस्ते महामार्गावर असलेले रसवंतिगृह बहुतांश बंद झाल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात मोलमजुरी करीत आहेत. तर काही व्यावसायिकांनी व्यवसाय बदलून भाजीपाल्यावर आपला उदरनिर्वाह सुरू केल्याचे चित्र आहे.
हेही वाचा: "पराभव पचवायची सवय लावून घ्या…", भुजबळांंचा चंद्रकांत पाटलांंना सल्ला
नियोजन कोलमडले
उन्हाळ्याच्या हंगामात रसवंतिगृह चालकांसह शीतपेय विक्रेत्यांनी ठराविक नफा मिळविण्याची आशा धरून त्यावर आपल्या कुटुंबाचे अर्थिक नियोजन ठरवून योजना आखल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटात सर्वच स्वप्न धुळीस मिळाले. आलेल्या संकटामुळे सर्वच नियोजन कोलमडून पडल्याच्या प्रतिक्रिया अनेक रसवंतिगृह चालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
या वर्षी चांगल्या प्रकारे रसवंतिगृहासाठी नियोजन केले होते. औरंगाबाद-अहवा राज्य महामार्गावर रसवंतिगृह थाटले होते. यासाठी ताज्या उसासह सामग्री तयार केली होती. मात्र ग्राहक नसल्याने कुटुंबीयांसह भाजीपाला व्यवसाय सुरू केला.
-अशोक रामोळे, रसवंतिगृहचालक, अंबासन
रसवंतिगृहातील सामग्रीचे भाव
- ऊस : ५,५०० रुपये टन
- प्लॅस्टिक ग्लास : ८० रुपयांत शंभर
- लिंबू : ६५९ रुपये पंचवीस किलोला
- बर्फ लादी : ४०० रुपये शंभर किलो
- डिझेल : ८६.५३ प्रतिलिटर
हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : जिल्हाबंदीचे वाजलेत तीन तेरा; पाहा VIDEO
Web Title: Small Businesses Are Suffering Due To Lockdown Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..