Marathi Rajbhasha Din: बोललो शब्द पहिला, तो शब्द मराठी...सोशल मीडियाने जडवली अन् वाढवली मायबोलीची गोडी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Rajbhasha Din

Marathi Rajbhasha Din: बोललो शब्द पहिला, तो शब्द मराठी...सोशल मीडियाने जडवली अन् वाढवली मायबोलीची गोडी!

येवला (जि. नाशिक) : बोललो शब्द पहिला, तो शब्द मराठी... लिहिले पहिले अक्षर, ते अक्षर मराठी.. बोलिन एक भाषा, ती भाषा मराठी.. दाखवीन उद्याची आशा, ती आशा मराठी..! (Social media added and increased sweetness of language Marathi Rajbhasha Din nashik news)

साहित्यात मातृभाषेचा गायलेला गोडवा मराठी भाषेची महती सांगून जातो. मात्र ही मातृभाषा लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने तिच्या जपणुकीचे प्रयत्न सुरू आहेत. आज मराठी भाषा दिनानिमित्त हेच अपेक्षित आहे.

या सगळ्या प्रवासात मात्र कुटुंब व्यापलेल्या सोशल मीडियात मायबोलीचा वाढलेला वापर अन् भाषेची वाढत असलेली गोडी भाषा समृद्धीसाठी सुकावह मानली जातेय. वि. वा. शिरवाडकर अर्थात, कुसुमाग्रज यांची जयंती जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरी होताना तमाम मराठी जणांना याचा नक्कीच अभिमान वाटतोय.

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी... असे कविवर्य सुरेश भटांनी मायबोलीचे कौतुक करताना म्हटले आहे. जागतिकीकरणात मराठी भाषेचे अस्तित्व कसे टिकणार, हाच प्रश्न निर्माण झाल्याने भाषा जतन करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालेच; पण विविध उपक्रमांचीही गरज आहे.

मात्र टीकेचा आणि उपहासाचा धनी ठरलेले व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर ही माध्यमे मात्र याच मायबोलीच्या प्रचार- प्रसाराचे नेटाने कार्य करत आहे. मोबाईलवर मराठी टायपिंगचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने सोशल मीडियावर व्यक्त होताना मराठी भाषेतूनच कार्यालयीन निरोप.

कौटुंबिक संदेश, सुप्रभात, शुभरात्री, शुभेच्छा, वाढदिवस शुभेच्छा यापासून ते विविध सुंदर बोधकथा, चारोळ्या, विविध मार्गदर्शनपर कोट्स अशा असंख्य गोष्टी आता सोशल मीडियाचे प्रमुख साधन बनले आहे. मराठीतून शुभेच्छा देण्यासह स्टेटस अपडेट करण्यासह सर्व संदेश पाठवण्यास पसंती मिळत आहे.

चार-पाच वर्षांत मराठीतून पोस्ट करण्याच्या प्रमाणात तब्बल चौपटवाढ झाली आहे. माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वाधिक मराठी भाषा वापरली जात असल्याचे दिसत आहे. गुगलनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ७३ टक्के युजर्स त्यांच्या स्थानिक भाषेतून ऑनलाइन डेटा सर्च करतात.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

यात मराठी आणि बंगाली भाषेचा वापर सर्वाधिक होत आहे. सोशल मीडियावरील स्टेटस, मिम्सशुभेच्छा आणि प्रेम संदेशांची सर्वाधिक भर असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर सतत इंग्रजीत बोलणारी तरुणाई मराठीत लेखन करीत आहे. त्यामुळे जवळपास ८० टक्‍क्‍यांहून अधिक मोबाईलधारक मराठी टायपिंगचे ॲप वापरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बाब कौतुकास्पद आहे.

ॲपमुळे सोपे झाले काम!

पूर्वी मराठी टायपिंग जिकिरीचे होते. पण गुगलमुळे मराठीसाठी गुगल इंडिक की बोर्ड सहज उपलब्ध आहे. त्याद्वारे मराठीतून मजकूर टाईप करणे सोपे झाले आहे. याशिवाय गुगलने व्हाईस म्हणजेच बोललं की टाईप होणे, हाताने टाइप करणे असे अनेक पर्यायही उपलब्ध केले आहे.

त्यामुळे सोप्या संदेशापासून तर कार्यालयीन कामकाज करण्यासाठी मराठीचा वापर होत आहे. प्ले स्टोअरवरही असंख्य मराठी कीबोर्ड उपलब्ध आहेत.

*हजारों पेज, ॲप

फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल सर्चवर अनेक मराठी नावाने पेजेस सुरू आहेत. मराठी कविता, विनोद, बोधकथा, चारोळ्या इथपासून तर ज्ञानेश्वरी, शब्दकोश, विश्वकोश असे सर्वच पर्याय उपलब्ध होतात. प्ले स्टोअरमध्येही शंभरावर मराठी ॲप आहेत.

मराठी माती, वपु एक विचार, बीइंग मराठी, वेबसीरिज, मी मराठी, पुण्याचा सरपंच, मराठी टच, फनमराठी, जोश टाल्क अशा अनेक दर्जेदार पेजेसनी मराठी माणसांची मनं जिंकली आहेत. इन्स्टा,फेसबुकवर तर सामान्य लोकांनाही चारोळ्या, सुविचार, कथा शेअर करण्याने आपसूक भाषा समृद्ध होत आहे हे नक्की!

"सोशल मीडियामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपले मत व्यक्त करू शकतो. भाषेतले पर्याय मोबाईलद्वारे उपलब्ध होत आहे. मातृभाषेतून वाचन व लेखनाची गोडी वाढल्याने मराठीची नक्कीच समृद्धी होतेय. हे होताना भाषेची शुद्धता जपली जावी तसेच अनेक जण शॉर्टकटचा पर्याय वापरतात टाळावे."

-डॉ. भाऊसाहेब गमे, प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय, येवला