Solar Pump Village: सर्वाधिक सौरपंप असलेले नाशिक जिल्ह्यातील एकमेव गाव, येथे शेतीला विजेची गरज नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solar Pump Village

Solar Pump Village: सर्वाधिक सौरपंप असलेले नाशिक जिल्ह्यातील एकमेव गाव, येथे शेतीला विजेची गरज नाही

सिन्नर : पावसाच्या पाण्यावर खरिपाचे एखादे पीक घ्यायचे आणि उरलेल्या कालावधी दुसऱ्याच्या बांधावर जाऊन मोलमजुरी करायची. वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने इतर हंगामात शेती पिकवता येत नसल्यामुळे वर्षानुवर्षे हाच धडा गिरवणाऱ्या कोनांबे येथील दुर्गम आणि डोंगराळ भागातील शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती सौर कृषीपंपांमुळे बदलली आहे.

आज एकट्या कोनांबे गावात जिल्ह्यात सर्वाधिक १४० कृषिपंप मुख्यमंत्री कृषी सौर कृषी आणि प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेच्या माध्यमातून बसवण्यात आले आहेत. यात जवळपास ७५ सौर कृषी पंप जिथे वीजच पोचली नव्हती, अशा डोंगरदऱ्यात असलेल्या शेतात बसवण्यात आले असून, येथील जवळपास ७०० एकर शेती सिंचनाखाली आली असून, तेथे बारमाही उत्पादन घेतले जात आहे.

ज्यांच्या शेतात वीजच पोचली नाही, अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून माजी सरपंच संजय डावरे यांनी त्यांना सौर कृषिपंपाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुढाकार घेतला. सुरवातीला गावात पाच जणांनी आपल्या शेतात सौर कृषी पंप बसविले.

कडाक्याची थंडी, भारनियमन, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, रात्री पिकांना पाणी देण्याच्या वेळी साप, बिबट्यासह अन्य हिंस्त्र पशूंच्या हल्ल्याची भिती आदींपासून या शेतकऱ्यांची सुटका झाली. वीज बिलाची झंझट देखील टळली. कोनांबेच्या शिवारात डोंगराळ भागात वीजपुरवठा करण्यासाठी यंत्रणा उभी करणे केवळ अशक्य होते.

तेथील शेतकऱ्यांना सौर पंपांमुळे मोठा आधार मिळाला. त्यामुळे डोंगर कपारीत राहणारे आदिवासी, शेतकरी प्रचंड पाऊस असूनही केवळ विजे अभावी एकच पिक घेत उदर निर्वाह करत होते. तिथे आता सौर कृषी पंपामुळे सुमारे ७०० एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.

उत्पन्नात भरघोस वाढ

विहीर होती पण वीज नव्हती. त्यामुळे सिंचनाचे कुठलेच साधन नव्हते. फक्त पावसावर खरीप हंगामात भात पीक घ्यायचो. आता विहीरीवर आणि शेततळ्यावर सौर कृषी पंप बसविल्यामुळे ४ एकर शेती बारमाही सिंचनाखाली आली आहे. भाजीपाला वर्गीय पिके घेता येवू लागल्यामुळे आर्थिक उत्पन्न देखील वाढले. - दशरथ डावरे, शेतकरी

आर्थिक स्तर उंचावला

शेतातील बांधापर्यंत वीज न पोहोचलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी प्रवृत्त केले. मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून ११५ तर प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेतून उर्वरित सौर पंप बसवण्यात आले. यात आदिवासी शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. सौर पंप बसवून दिल्यामुळे आदिवासींची जिरायती शेती पाण्याखाली आली, त्यांच्या उत्पन्नातही दुप्पट वाढ झाली. इतरांच्या शेतात मजुरीसाठी जायची गरज संपली. - संजय डावरे, माजी सरपंच