नाशिक : इंदिरानगर-राणेनगर बोगद्यांच्या समस्येवर उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunnel

नाशिक : इंदिरानगर-राणेनगर बोगद्यांच्या समस्येवर उपाय

इंदिरानगर (जि. नाशिक) : इंदिरानगर आणि सिडकोच्या (Cidco) नागरिकांची डोकेदुखी ठरलेल्या इंदिरानगर (Indiranagar) व राणेनगर येथील बोगद्यांना (Tunnel) दोन्ही बाजूला वाढविणे आणि त्यावरून समांतर उड्डाणपूल (Flyover) बांधणे हा उपाय करून ही समस्या येत्या तीन महिन्यांत कायमची दूर होण्याची शक्यता खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (National Highways Authority) तांत्रिक व्यवस्थापक दिलीप पाटील यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेतून समोर आली.

शिवसेनेतर्फे (Shivsena) खासदार गोडसे यांना बोगद्याच्या पाहणीसाठी आमंत्रित केले होते. तांत्रिक व्यवस्थापक पाटील यांनी सांगितले, की इंदिरानगर येथील बोगदा दोन्ही बाजूला साडेसात मीटर वाढवून त्याच्यावरून साधारण तीन मीटर उंचीचे समांतर उड्डाणपूल बांधणे शक्य आहे. यामुळे गोविंदनगर (Govindnagar) आणि इंदिरानगर मार्ग दुहेरी वाहतूक सुरू होऊन ही वाहतूक सरळ पुढे जाऊ शकेल, तर समांतर छोट्या उड्डाणपुलावरून ज्या वाहनांना सरळ जायचे आहे, ते दोन्ही बाजूने सरळ निघून जाऊ शकतील. त्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न निकाली निघणार आहे. या ठिकाणी बॉक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करून बोगद्याची रुंदी वाढविता येण्याचा उपाय आहे. मात्र, तो अत्यंत खर्चिक असूनही वेळ खूप लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याच पद्धतीने राणेनगर येथील बोगदा चार मीटर पुढे काढून राजीवनगर (Rajivnagar) आणि सिडको येथे जाणारी वाहने सरळ जातील तर त्यावर बांधलेल्या समांतर उड्डाणपुलावरून मुंबई नाका (Mumbai Naka) आणि पाथर्डी फाट्याकडे (Pathardi Fata) जाणारी वाहने सरळ जाऊ शकतील, असा उपाय सुचविण्यात आला.

हेही वाचा: JM Road: भुयारी मार्ग बंद असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

खासदार गोडसे यांच्यासह उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना हे पर्याय तत्त्वता पसंत पडल्याने खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत सर्व पूर्तता करून प्रस्ताव पाठविण्यास सांगितले, जेणेकरून पुढील तीन महिन्यांत या भागातील नागरिकांची कायमस्वरूपी या समस्येतून मुक्तता करण्याच्या कामाला सुरवात करणे शक्य होईल. या भागात असलेल्या मोठ्या शाळा (High school), महाविद्यालय (College), औद्योगिक वसाहतींमुळे वाहनांची वर्दळीमुळे या ठिकाणच्या वाहतूक कोंडीला नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. यावर तातडीने उपाययोजनेसाठी शिवसेनेतर्फे खासदारांना पाचारण केले होते. माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, माजी नगरसेवक अमोल जाधव, हृषीकेश वर्मा, संजय गायकर, सागर दळवी, बंडू दळवी, नीलेश साळुंखे, आकाश खोडे, प्रवीण जाधव, दीपक पंडित, राजू थेटे, कैलास जाधव, अरुण मुनशेट्टीवार, नाना पाटील, सरप्रीतसिंग बल, चंद्रकांत बोंबले, अनिल खोडे, देवीदास शिरसाठ, सागर नागरे, कैलास बनकर, हृषीकेश राऊत, ठेकेदार भूषण शिंदे, आकाश कदम, शैलेश कार्ले आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : 50 शेतकऱ्यांनी गुजरातमध्ये गिरविले कांदाप्रक्रियेचे धडे

८ मार्चपासून पर्यायी मार्ग खुला

तातडीचा उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे पाथर्डी फाट्याकडे जाताना हॉटेल साई पॅलेसजवळील सर्व्हिस रोडवर उड्डाणपुलावरून वाहने उतरण्याची अतिरिक्त सोय करण्यात येत असून, हा पर्यायी मार्ग ८ मार्चपासून खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे स्प्लेंडर हॉलजवळ मोठ्या संख्येने खाली उतरणाऱ्या वाहनांमुळे राणेनगर बोगद्यात होणारी कोंडी टळणार आहे. त्याच पद्धतीने सिडकोच्या बाजूच्या सर्व्हिस रोडवरही वाहनांना उतरण्याची सोय करण्यात येणार असल्याने इंदिरानगर बोगद्यावर वाहने उतरताना होणारी कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. हा मार्गही मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title: Solution For Indiranagar Ranenagar Tunnel Problem Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..