अशोकस्तंभावरील स्वीटस्‌च्या दुकानात घुसली भरधाव कार; वाडाही कोसळला अन् संशयित चालक निघाला पोलीस : Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

speeding car enters sweet shop

Nashik News: अशोकस्तंभावरील स्वीटस्‌च्या दुकानात घुसली भरधाव कार; वाडाही कोसळला अन् संशयित चालक निघाला पोलीस

नाशिक : अशोकस्तंभावर (Ashok Stambh) मंगळवारी (ता.१४) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील चारचाकी कार (Car) श्याम स्वीटस्‌ या दुकानाचे बंद शेटर तोडून आतमध्ये घुसल्याची घटना घडली. (speeding car enters sweet shop on Ashok Stambha Suspect driver turned out to be police nashik crime news)

या अपघातात दुकानातील सामान व पदार्थांचा चक्काचुर झाला आहे. संशयित कारचालक हा नाशिक ग्रामीण पोलीस दलात वाहनचालक असून सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश विश्वास पवार (४३, रा. उंटवाडी) असे संशयित कारचालक पोलिसाचे नाव आहे. किसनदास वैष्णव (रा. अथर्व पार्क, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे अशोकस्तंभावरील ढोल्या गणपतीशेजारी श्याम स्वीटस्‌ हे मिठाईचे दुकान आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मंगळवारी (ता. १४) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास काळ्या रंगाची झेस्ट टाटा चारचाकी कार (एमएच १९ सीयु ०८४९) भरधाव वेगात आली. सदरील कारवरील चालक पवार यांचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील कार अशोकस्तंभावरील वैष्णव यांच्या श्याम स्वीटस्‌ या मिठाई दुकानाचे लोखंडी शटर तोडून आतमध्ये घुसली.

या अपघातामध्ये स्वीटस्‌ दुकानातील मुख्य शटर, काऊंटर, आईस्क्रिम फ्रिज यासह दुकानातील साहित्य व खाद्यपदार्थांचे असे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर, अपघात कारचा समोरील भागही नुकसानग्रस्त झाला होता.

या अपघातात कारचालक पवार जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संशयित कारचालक महेश पवार यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पवार हे नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस वाहन चालक आहेत.

अपघात झालेला वाडा कोसळला

अशोकस्तंभावर मंगळवारी (ता.१४) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील चारचाकी कार श्याम स्वीटस्‌ या दुकानाचे बंद शेटर तोडून आतमध्ये घुसल्याची घटना घडली त्यामुळे अशोक स्तंभ येथील अपघात झालेला वाडा कोसळला आहे. यामुळे मोठी गर्दी झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे.

टॅग्स :Nashikpolicecrimeaccident