SSC Exam Copy Case : बीजगणितच्‍या पेपरला विभागात 22 कॉपी बहाद्दरांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

copy case

SSC Exam Copy Case : बीजगणितच्‍या पेपरला विभागात 22 कॉपी बहाद्दरांवर कारवाई

नाशिक : आत्तापर्यंत शांततेत सुरू असलेल्‍या दहावीच्‍या परीक्षेत सोमवारी (ता. १३) शिक्षण मंडळाच्‍या भरारी पथकांनी धडक कारवाई केली. यापूर्वी प्राप्त तक्रारींनुसार काही परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देत कॉपीच्या प्रकारांना अटकाव करण्यात आला.

दरम्यान, सोमवारी (ता. १३) बीजगणितच्‍या पेपरला नंदुरबारमध्ये १३ आणि नाशिक जिल्ह्यात नऊ अशा एकूण २२ कॉपी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. (SSC Exam Copy Case Action taken against 22 copy offenders in Algebra paper nashik news)

यंदा दहावीच्या परीक्षेत आतापर्यंत विविध विषयांच्‍या पेपरला फारसे गैरप्रकार आढळले नाहीत. नाशिक व नंदुरबारला तर कॉपीचा एकही प्रकार आढळला नसल्‍याची नोंद होती. धुळे जिल्ह्यातही एकच कॉपीचा प्रकार नोंदविला गेला.

परंतु काही परीक्षा केंद्रांवर आपल्‍या शाळेचा निकाल उंचावण्यासाठी थेट शिक्षकांकडूनच कॉपी पुरविली जात असल्‍याच्या तक्रारी शिक्षण मंडळाला प्राप्त झाल्‍या होत्‍या. या तक्रारींची दखल घेत बीजगणितच्‍या पेपरला गोपनीय स्वरूपात भरारी पथके तैनात केली होती.

सोमवारी बीजगणितच्‍या पेपरला पथकांनी निर्धारित परीक्षा केंद्रांवर धडक कारवाई केली. नंदुरबार जिल्ह्यात १३ आणि नाशिक जिल्ह्यात नऊ अशा एकूण २२ कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. यातून नाशिक विभागात एकूण कॉपी प्रकारांची संख्या २३ झाली आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

भूमितीच्‍या पेपरवर राहणार करडी नजर

बीजगणितप्रमाणेच बुधवारी (ता. १५) भूमिती विषयाच्‍या पेपरवर शिक्षण मंडळाच्‍या पथकांची करडी नजर असणार आहे. विभागात कुठलाही गैरप्रकार घडू नये व कॉपी प्रकरणांवर आळा घालण्यासाठी हे पथक सज्‍ज असणार आहेत. तसेच, यापुढील विषयांच्‍या परीक्षेत तक्रार प्राप्त असलेल्‍या परीक्षा केंद्रांवरही लक्ष ठेवले जाणार असल्‍याचे समजते.

"काही परीक्षा केंद्रांवर शिक्षकांकडून कॉपीसाठी मदत केली जात असल्‍याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्‍यानुसार बीजगणितच्‍या पेपरला शिक्षण मंडळाच्‍या पथकांनी धडक कारवाई करत कॉपीच्या प्रकारांना आळा घातला. भूमितीच्‍या पेपरलाही हे पथक तत्‍पर राहणार आहे."

-नितीन उपासनी, अध्यक्ष, शिक्षण मंडळ, नाशिक विभाग

टॅग्स :NashikSSC Exam