SSC HSC Result: नाशिक विभागात दहावीचे 41.90, तर बारावीचे 36.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण | SSC HSC Result 42 of Nashik division 10th passed while 37 of 12th passed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

result

SSC HSC Result: नाशिक विभागात दहावीचे 41.90, तर बारावीचे 36.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

SSC HSC Result : दहावी आणि बारावीच्‍या जुलै-ऑगस्‍टमध्ये घेतलेल्‍या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. २८) जाहीर झाला. नाशिक विभागाच्‍या निकालात गेल्‍या वर्षीच्‍या पुरवणी परीक्षेतील निकालाच्‍या तुलनेत सुधारणा झाली आहे.

नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतून दहावीसाठी सहा हजार १२१ पैकी दोन हजार ५६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ४१.९० टक्‍के निकालाची नोंद झाली. बारावीमध्ये पाच हजार ४३६ पैकी दोन हजार ००१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ३६.८१ टक्‍के लागला. (SSC HSC Result 42 of Nashik division 10th passed while 37 of 12th passed)

शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्‍टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. नाशिक विभागाच्‍या निकालात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे.

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्‍याने मंगळवार (ता. २९) पासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्‍या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

गुणपडताळणीसाठी अर्जाची मुदत ७ सप्‍टेंबरपर्यंत असेल. उत्तरपत्रिकांच्‍या छायाप्रती मागणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोच करता येणार आहेत. प्रतिविषय चारशे रुपये शुल्‍क अदा करून छायांकित प्रत मिळणार आहे.

विज्ञान शाखेचा निकाल ६१.८० टक्‍के

बारावीच्‍या निकालाचे विश्र्लेषण केल्‍यास उत्तीर्णांमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थी सर्वाधिक आहेत. विज्ञान शाखेत एक हजार ८२२ पैकी एक हजार १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्‍केवारी ६१.८० टक्‍के आहे.

वाणिज्‍य शाखेतून ७६४ पैकी १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांची टक्‍केवारी २२.३८ टक्‍के आहे. कला शाखेत दोन हजार ६४७ पैकी ६६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्‍केवारी २५.०४ टक्‍के आहे.

एचएससी-व्‍होकेशनलमध्ये २०२ पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २०.२९ टक्‍के अशी उत्तीर्णांची टक्‍केवारी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दहावीच्या निकालात सुधारणा

नाशिक विभागात दहावीसाठी प्रविष्ट झालेल्‍या सहा हजार १२१ पैकी दोन हजार ५६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्‍केवारी ४१.९० टक्‍के आहे. नऊ विभागांमध्ये नाशिक तिसऱ्या स्‍थानावर आहे.

सप्‍टेंबर-ऑक्‍टोबर २०२१ मधील पुरवणी परीक्षेचा निकाल ४९.५४ टक्‍के होता. जुलै-ऑगस्‍ट २०२२ चा निकाल ३९.१३ टक्‍के लागला होता. त्‍यात यंदा सुधारणा झाली आहे.

बारावीच्‍या निकालात नाशिकचे राज्‍यात चौथे स्‍थान

बारावीमध्ये नोंदणीकृत पाच हजार ४७२ पैकी पाच हजार ४३६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. यातून दोन हजार ००१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ३६.८१ टक्‍के आहे. राज्‍यातील नऊ विभागांत नाशिकचा निकाल चौथ्या स्‍थानी आहे.

सप्‍टेंबर-ऑक्‍टोबर २०२१ मध्ये नाशिक विभागाचा निकाल ३० टक्‍के होता. जुलै-ऑगस्‍ट २०२२ मध्ये ३१.०८ टक्‍के निकाल लागला. तर जुलै-ऑगस्‍ट २०२३ मध्ये सुधारणा होऊन ३६.८१ टक्‍के निकाल लागला.

दहावीच्या निकालाची जिल्‍हानिहाय आकडेवारी-

जिल्‍हा प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी

नाशिक ३,३२८ १,००६

धुळे १,४९९ ९१४

जळगाव १,०३२ ५२७

नंदुरबार २६२ ११८

बारावीच्या निकालाची जिल्‍हानिहाय आकडेवारी-

जिल्‍हा प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी

नाशिक ४,०२९ १,२७४

धुळे ५४३ ३५५

जळगाव ६५० ३०६

नंदुरबार २१४ ६६