Nashik Crime News : मौजमजेसाठी विद्यार्थी बनले Mobile Snatcher! मोबाईल खेचणाऱ्या चौघांना पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

City Crime Branch Deputy Commissioner Prashant Bachhav along with four suspects of mobile snatching

Nashik Crime News : मौजमजेसाठी विद्यार्थी बनले Mobile Snatcher! मोबाईल खेचणाऱ्या चौघांना पकडले

नाशिक : रस्त्याने पायी चालत मोबाईलवर बोलणाऱ्यांच्या हातातील मोबाईल दुचाकीवर येऊन बळजबरीने हिसकावून पोबारा करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने ही कामगिरी केली असून, सात गुन्ह्यांची उकल करून सुमारे साडेचार लाखांचे महागडे २२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, अटक केलेले चौघेही महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुण असून, मोबाईल हिसकावून ते विकायचे आणि त्या पैशातून मौजमजा करायचे. त्यामुळे चौकशीतून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. (Students Become Mobile Snatchers For Fun four arrested Nashik Crime News)

चेतन निंबा परदेशी (रा. शांतिनगर, सिडको), शशिकांत सुरेश अंभोरे (रा. पौर्णिमा बस स्टॉपजवळ), विजय सुरेंद्र श्रीवास्तव (रा. जुने सिडको), निखिल अर्जुन विंचू (रा. पाथर्डी फाटा), अशी अटक केलेल्या चौघा संशयितांची नावे आहेत.

४ फेब्रुवारीला पाटील लेन परिसरातील मॅग्नम हॉस्पिटलसमोरून पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोबाईल हिसकावून नेला. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करीत असताना, वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, महेश साळुंके यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चेतन, शशिकांत व विजय या तिघा संशयितांची ओळख पटली.

त्यानंतर उपनिरीक्षक विष्णू उगले, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रवीण म्हसदे, शरद सोनवणे, नाझिमखान पठाण, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मुक्तार शेख यांच्या पथकाने तिघांनाही सापळा रचून जेरबंद केले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

तिघांकडून महागडे २२ मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा चार लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलिस चौकशीमध्ये आडगाव हद्दीतील एका मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यात निखिल विंचू याचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्यासही अटक करून तपासासाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

कमी श्रमात जास्तीचे पैसे

पोलिस तपासात चौघेही संशयित हे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. मौजमजेसाठी कमी श्रमात जास्तीचे पैसे कमविण्याच्या उद्देशाने चौघेही मोबाईल स्नॅचिंगकडे वळले.

संशयितांच्या चौकशीतून सात जबरी चोऱ्यांची उकल झाली आहे. मौजमजेची हौस भागविण्यासाठी ते जबरी चोरीच्या गुन्ह्यात अडकून गुन्हेगार झाले आहेत. मुंबई नाका हद्दीतील गुन्हे २०२२ मधील असून उर्वरित ६ गुन्हे गेल्या दीड महिन्यातील आहेत.

यात आडगाव हद्दीतील तीन, सातपूर हद्दीतील दोन आणि सरकारवाडा हद्दीतील एका गुन्ह्याचा समावेश आहे. पोलिस चौकशीतून संशयितांकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.