
Nashik News : दिंडोरीत विद्यार्थ्यांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे; बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष
Nashik News : दिंडोरी, नाशिक कळवण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. परंतु हे खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असताना दिंडोरीत चिमुकल्यांनी अखेर हे खड्डे बुजवित प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. (Students filled potholes on road in Dindori nashik news)
नाशिक कळवण रस्ता अक्राळे फाट्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग दिंडोरी तर पुढे कळवण पर्यंत हायब्रीड अन्युटी ठेकेदारांकडे असून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सटाणा यांचे नियंत्रण आहे. मात्र दोन्ही विभागांकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी डोळेझाक होत आहे. मध्यंतरी तळेगाव येथे ग्रामस्थांकडून तर दिंडोरीत एक सामाजिक संस्थेकडून खड्डे बुजवले होते.
दिंडोरीत जनता हायस्कूल जवळ खूप मोठे खड्डे पडले असून रोज अपघातांना निमंत्रण मिळत असते.
याबाबत संबंधित विभागाला कळवून देखील अद्यापपर्यंत रस्ते बुजविण्यात आलेले नाही. यातच शुक्रवारी (ता.२२) रात्री हायस्कूल जवळील मोठ्या खड्ड्यात दुचाकीस्वार यांचा अपघात झाला. यानंतर चिंतामणी नगर मधील नागरिकांनी तत्काळ जखमींना मदत करत अपघातास जबाबदार खड्डा बुजविण्यासाठी येथील शालेय मुलांनी पुढाकार घेत मोठा खड्डा परिसरातून दगड मुरूम आणत बुजवला.
साहिल वडजे, आयुष वडजे, आदित्य वडजे व श्रेयस सोनवणे यांनी हा खड्डा बुजवित रस्त्यावरील इतर खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. आता तरी प्रशासन जागे होऊन संबंधित ठेकेदारांकडून खड्डे बुजविणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.