
'अभिजात मराठीसाठी आता जनरेटा' - सुभाष देसाई
नाशिक : सर्व निकष पूर्ण करूनदेखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय व्हावा यासाठी जनतेकडून पत्रे संकलित करून ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याचिकेसाठी सुपूर्द केली जातील. या मोहिमेला शुक्रवारी (ता. ३) ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासून सुरवात केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री तथा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (ता. २) येथे दिली.
देसाई यांनी गुरुवारी संमेलनस्थळी भेट देत विविध कामकाजाचा आढावा घेतला. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, समन्वयक समीर भुजबळ, ॲड. रवींद्र पगार, पंकज भुजबळ यांच्यासह संमेलनाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. देसाई यांनी अभिजात मराठीसाठीच्या विशेष दालनाला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला व नंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, की यापूर्वी भाषा समितीच्या तज्ज्ञांनी सर्व पुरावे पडताळले असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी पात्र असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आतापर्यंत सहा भाषांना हा दर्जा प्राप्त झालेला असून, सर्व निकष पूर्ण करूनही मराठीला हा दर्जा का बहाल केला जात नाही, हे अनाकलनीय आहे. नाशिकला होत असलेल्या या संमेलनानिमित्त जनतेतून पत्रे संकलित करून ती राष्ट्रपतींना सुपूर्द केली जातील.
हेही वाचा: सूर, काव्य सुमधुर गीतांनी सजली संमेलनाची पूर्वसंध्या | Nashik
माहितीपट, प्रदर्शनातून माहिती
देसाई म्हणाले, की संमेलनानिमित्त अभिजात मराठी दालन उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात कशी आहे, याची माहिती या दालनातून दिली जाणार आहे. साहित्य संमेलनातील सहभागींनी दालनास भेट देताना मराठी भाषेच्या न्याय्य हक्कासाठी उभे राहावे. संमेलन कालावधीत सतरा मिनिटे कालावधीचे माहितीपत्र या दालनात दाखविले जाईल. दालनात मराठीच्या इतिहासाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शविणारा आढावा घेतला आहे. अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहामनी काल, शिवकालीन, पेशवेकालीन, १९ व्या शतकातील मराठी, आधुनिक मराठी अशा दोन हजार वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासाची माहिती देणाऱ्या विविध पुराव्यांची मांडणी केली आहे. संबंधित शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, दुर्मिळ ग्रंथ, निवडक कथा आदींच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन या दालनात आहे.
हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका; ८७७ मेंढ्यासह बाराशेवर पशुधन मृत्यूमुखी
Web Title: Subhash Desai Said Letters Collected From People For Classical Marathi Will Be Given To President
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..