
Success Story: विना शिकवणी गौरवने मारली बाजी! चांगली नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय यशस्वी
Success Story : शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार..अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना बहुराष्ट्रीय कंपनीत चांगली नोकरीदेखील मिळाली. पण कोरोना काळात एकाएकी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेत चांगली नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
अन् केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत १४६ वा क्रमांक मिळवतांना हा निर्णय यशस्वी करून दाखविला. विनाशिकवणी परीक्षेत यशस्वी झालेल्या या युवकाचे नाव आहे गौरव गंगाधर कायंदेपाटील. त्याची यशोगाथा सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आहे. (Success Story Gaur pass upsc without tuition nashik news)
गौरवचे शालेय शिक्षण सिल्वर ओक इंग्रजी माध्यम शाळेतून झाले. शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असल्याने त्याने दहावी ९१ टक्के गुणांसह घवघवीत यश मिळविले. पुढे आरवायके महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेताना सिंहगड महाविद्यालयातून कॉम्प्युटर शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
यानंतर टिपको या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला सुरवात केली. यादरम्यान इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ येथून एमए (लोक प्रशासन) हे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.
चांगली नोकरी सुरु असतांना कोरोना महामारीच्या कालावधीदरम्यान २०१९ मध्ये नोकरी सोडून स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा धाडसी निर्णय गौरवने घेतला. सुरवातीला नाशिकला घरीच अभ्यास करताना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत चाचपणी केली.
परीक्षेचे स्वरूप समजून घेताना, जोमाने तयारी करण्याचा निर्धार केला. त्यासाठी थेट दिल्ली गाठले. कुठलीही शिकवणी न लावता, अभ्यासिकेत अभ्यास करताना दुसऱ्याच प्रयत्नात १४६ वा क्रमांक पटकावताना यशाला गवसणी घातली आहे.
त्याचे वडील गंगाधर कायंदेपाटील हे बीवायके महाविद्यालयात उपप्राचार्य असून, लेखकदेखील आहेत. भाऊ चैतन्य कायंदेपाटील हे पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते असून, सध्या केटीएचएम महाविद्यालयात मास मीडिया विभागात प्राध्यापक आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आयआयटीचे स्वप्न हुकले, पण अधिकारी होण्याचे साधले
अभ्यासात हुशार असल्याने गौरवला आयआयटीमधून अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे होते. त्याअनुषंगाने तयारीदेखील सुरु होती. प्रवेश परीक्षेतील पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला.
परंतु यादरम्यान झालेल्या अपघातामुळे पुढील टप्यातील परीक्षा देता आली नाही. त्यामुळे आयआयटीमधून शिक्षणाचे स्वप्न हुकले. हताश न होता अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केले आहे.
सतरा ते अठरा तासांचा अभ्यास
पुण्याला असतांना पहिल्या प्रयत्नात परीक्षा दिली होती. स्वरूप लक्षात आल्यानंतर दिल्ली गाठताना तेथे रोजचा सुमारे सतरा ते अठरा तास अभ्यास केला. सण-उत्सव असो किंवा कौटुंबिक सोहळे, मनाला आवर घालताना अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले.