Agriculture News: खामखेड्यात पांढऱ्या टरबुजाचे यशस्वी उत्पादन; 75 दिवसात दीड लाखाचा फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

Agriculture News: खामखेड्यात पांढऱ्या टरबुजाचे यशस्वी उत्पादन; 75 दिवसात दीड लाखाचा फायदा

खामखेडा : सध्या कुठल्याच पिकाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च देखील काही वेळेस निघत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे कोणते पीक घ्यावे अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे.

मात्र खामखेडा येथील शेतकरी दौलत श्रावण मोरे याला अपवाद ठरले आहे. त्यांनी तेलंगणा भागातील पांढऱ्या पट्टेदार टरबूज पिकाची लागवड करत सत्तर दिवसात दीड लाखाची कमाई केली आहे.

येथील दौलत मोरे हे दरवर्षी टरबूज लागवड करतात. कसमादे भागात मोठ्या प्रमाणावर काळपट रंगाच्या कलिंगडाची लागवड केली जाते. मात्र त्यांचे चिरंजीव नितीन यांनी टरबूज व्यापाऱ्याकडून उन्हाळ्यात कोणत्या टरबूजास अधिक मागणी असते. याचा अभ्यास करत पट्टेदार नामधारी टरबूज वाणाचे बियाणे मागवून ते तयार करत २० जानेवारी रोजी वीस गुंठे क्षेत्रावर लागवड केली.

लागवडीनंतर योग्य पीक व्यवस्थापन करत विद्राव्य खतांची मात्रा दिल्याने त्यांचे पीक चांगले जोमदार आले आणि विक्रमी असे दर्जेदार टरबुजाचे उत्पादन त्यांना मिळाले. सध्या पहिल्या टप्प्यात पंधरा टन टरबूज निघाले आहे. या एक नंबर टरबूजास ११ रुपये दराने बाजारभाव मिळाला आहे. अजूनही दोन नंबर माल असून यातून देखील तीन ते चार टन माल मिळणार आहे. यातून उत्पादन खर्च निघणार असल्याचे ते सांगतात.

वीस गुंठे टरबूज शेतीसाठी त्यांना जवळपास २५ हजाराचा खर्च आला आहे. यामध्ये मल्चिंग, ठिबक सिंचन यांसारख्या खर्चाचा आणि रोपांच्या खर्चाचा समावेश आहे. ७५ दिवसाच्या कालावधीमध्ये खर्च वजा दीड लाखांची कमाई त्यांना झाली आहे. एक फळ साधारणतः १० किलोपर्यंत आहे.

''योग्य नियोजन व निगा राखत कमी कालावधीत व कमी खर्चात हे पीक काढले आहे. शेतकऱ्यांनी प्रयोगशील दृष्टिकोन ठेवत शेतात नवनवीन प्रयोग करण गरजेचे आहे.'' - दौलत मोरे टरबूज उत्पादक.