Summer Onion : उन्हाळ कांदा बाजारात दाखल; क्विंटलला सरासरी हजार ते बाराशे रुपये भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Summer onion has entered the market.

Summer Onion : उन्हाळ कांदा बाजारात दाखल; क्विंटलला सरासरी हजार ते बाराशे रुपये भाव

देवळा (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नवीन उन्हाळी कांद्याचे आगमन सुरू झाले. या कांद्याला सरासरी हजार ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.

या हंगामातील पहिलाच उन्हाळी कांदा बाजारात दाखल झाला असला तरी भाव कमी असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. त्यात अवकाळी पाऊस येत असल्याने उन्हाळ कांदा काढणे अवघड झाले आहे. (Summer onion entered market average price of one thousand to twelve hundred rupees per quintal nashik news)

कसमादे भागातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या उन्हाळ कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांनी सर्वच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उन्हाळ कांदा पिकवला व आता तो काढणीसाठी सज्ज झाला असला तरी अवकाळी पावसाच्या येण्याने शेतकऱ्यांना चिंता लागून आहे. देवळा बाजार समितीच्या आवारातही पाच-सहा ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी आला होता.

चांदवड, येवला, पिंपळगाव, लासलगाव, उमराणे, मालेगाव, वणी बाजार समित्यांमध्ये खरीप कांद्याची आवक अद्याप टिकून आहे. देवळा, सटाणा, कळवण बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यासोबत काही शेतकऱ्यांचा रब्बी कांदा बाजारात दाखल होऊ लागला आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथील प्रगतिशील शेतकरी भारत पगार यांनी नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेल्या नाशिक गावठी कांद्याची काढणी सुरू केली आहे. त्यांनी एकूण २५ एकर रब्बी कांद्याची लागवड केली होती.

मागच्या आठवड्यात काढणी केल्यानंतर १३ व १४ मार्च रोजी आठ वाहनांतून दिंडोरी बाजार समितीच्या वणी उपबाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेला असता १३ तारखेला नवीन उन्हाळ कांद्याला १ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर त्याच कांद्याला १४ मार्च रोजी १ हजार १९० व १ हजार २०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. यावर्षी लागवड, काढणी ते बाजारात दाखल करेपर्यंत सर्वच खर्च वाढला आहे.

टॅग्स :NashikOnion Crop