Summer Onion Storage : रखरखीत उन्हात कांद्याची साठवणूक; सिन्नरच्या पूर्व, पश्‍चिम भागातील चित्र | Summer Onion storage at east west side of Sinnar nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb thok while stocking summer onions with his family in the dry heat.

Summer Onion Storage : रखरखीत उन्हात कांद्याची साठवणूक; सिन्नरच्या पूर्व, पश्‍चिम भागातील चित्र

दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा

Summer Onion Storage : सिन्नर तालुक्यातील गावांना सर्वाधिक दुष्काळी भाग समजले जाते. पण, यंदा पावसाचे प्रमाण वाढलेले असल्याने हा भागदेखील पाणीदार झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात अवकाळीच्या कळा झेलत उन्हाळी कांदा लागवडीचे प्रमाण वाढले.

आता उन्हाळी कांदा काढणीचा अन् साठवणूकीचा हंगाम रखरखीत उन्हात सुरू असून, ऐन कांदा पिक जोरात असताना कांद्याच्या गाभ्यात पाणी शिरले. असे असतानाही या संकटातून वाचलेल्या कांद्याने तग धरला.

मात्र, सध्या समाधानकारक भाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. (Summer Onion storage at east west side of Sinnar nashik news)

सिन्नरच्या पुर्वेकडील गावांमध्ये विशेषत: देवनदी खोऱ्यात यंदा उन्हाळी कांदा हंगाम तीन टप्यात झाला. त्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाचे वाढलेले प्रमाण. त्यामुळे भर मे महिन्यात साठवण बंधारे व नाल्यावरील बंधाऱ्यांत पाणी दिसत आहे.

याच मुबलक पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. पण, कांदा पोसण्यासाठी हवामानाने साथ दिली नाही. त्यामुळे फवारणी करून शेतकऱ्यांनी खर्चिक पीक घेतले आहे. अवकाळी पावसाचा सामना करत उन्हाळी कांदा खळ्यावर ठेवून आता कांदा चाळीत साठवणूकीचा हंगाम सुरू आहे.

कांदा गोलटी, गोलटा, मध्यम, मोठा असे चार प्रकार करून हा कांदा वेगवेगळ्या पद्धतीने साठवला जात आहे. काही शेतकरी बांधवांनी कांदा शेतात काढला. कांदा पात टाकून साठवणूकीला वेळ घेतला. त्यांचा उन्हाळ कांदा शेतात सडला आहे.

तो तसाच शेतात गाडला जात आहे. बहुतेक ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील कांदा चाळीत साठवला. तो सडण्याच्या घटना घडत आहेत. सिन्नरच्या पुर्वेकडील व पश्चिम भागात उन्हाळी कांदा काढणीत व साठवणूकीसाठी मात्र वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उन्हाळी कांदा लागवड वाढली, त्या तुलनेत कांदा काढणी व साठवणूक केली जात असल्याने कांदा कमी दिसत आहे. असे असले, तरी अवकाळी पाऊस होऊन चांगला कांदा शिवारात साठवणूक करतानाही शेतकरी दिसत आहेत.

हा कांदा चमकदार रंगाचा, चांगल्या आकाराचा व वजनाचा आहे. असा कांदा किमान चार महिने चाळीत टिकू शकेल. त्यामुळे सध्या या भागात कांदा साठवणूकीचा हंगाम सुरू आहे.

वडांगळी, खडांगळी, किर्तांगळी, घंगाळवाडी, निमगाव सिन्नर, पिंपळगाव, मेंढी, चोंढी, शहा, पुतळेवाडी, पंचाळे, दातली, पांगरी, भोकणी, दोडी, नांदुर, दापुर, मऱ्हळ, पाथरे, देवपूर, धारणगाव, फर्दापूरसह पश्‍चिम भागातही सध्या उन्हाळी कांदा साठवणूक सूरू आहे.

"यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त झाले आहे. काढणीला अवकाळी पाऊस झाला. पण, कांद्याचा रंग व वजन टिकून आहे. त्यामुळे सतरा ट्रॅक्टर कांदा नव्याने उभारलेल्या चाळीत साठवत आहे." -जितेंद्र बाळासाहेब ठोक, युवा शेतकरी, खडांगळी

टॅग्स :Nashikonionsummer