
Summer Season : मालेगावचा पारा 41.2 अंशावर; दिवसभर चटके देणारे ऊन, हंगामी व्यावसायिकांचा जीव भांड्यात
Summer Season : शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. जीवाची काहिली होणारे ऊन पडत असल्याने नागरीक उकाड्याने त्रस्त होत आहेत. वाढते ऊन लग्नसोहळ्यांमध्ये वऱ्हाडींचा घाम काढत आहे.
अवकाळी पाऊस व ऊन-सावलीच्या खेळामुळे यंदा उन्हाची तीव्रता जाणवलीच नाही. मंगळवारी (ता. ९) पारा ४१.२ अंशावर होता. दिवसभर चटके देणारे ऊन अंगावर झेलत नागरिकांनी लग्नसोहळ्यांना हजेरी लावली.
सायंकाळी पाचनंतर झालेल्या ढगाळ वातावरणाने नागरिकांना दिलासा मिळाला. (Summer Season Malegaon mercury at above 40 degrees Scorching heat throughout day nashik news)
मालेगाव व ऊन यांचे वेगळेच नाते आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते मे या चार महिन्यापैकी किमान तीन महिने पारा ४० अंशापेक्षा अधिक असतो. एप्रिल व मे मध्ये येथील तापमान ४० ते ४५ अंशादरम्यान राहते.
यंदा फेब्रुवारीपासूनच अवकाळी पाऊस व ऊन सावलीचा खेळ सुरु झाला. मेच्या सुरवातीपर्यंत असेच वातावरण राहिल्याने उन्हाचा तडाखा बसला नाही. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तापमान सामान्य राहिले.
गेल्या तीन दिवसापासून कडक ऊन पडत आहे. मे महिन्यात लग्न सोहळ्यांची मोठ्या प्रमाणावर धूम सुरु आहे. एकाच दिवशी अनेक लग्न सोहळ्यांना हजेरी लावताना नागरिकांची तारांबळ उडत आहे. भर उन्हात लग्नसोहळ्यांना हजेरी लावताना ऊन वऱ्हाडींचा घाम फोडत आहे. कडक ऊन असतानाही लग्नसोहळ्यांमुळे दळणवळण वाढले आहे.
कडक उन्हामुळे नागरीक त्रस्त होत असले तरी हंगामी व्यावसायिकांना दिलासा मिळत आहे. मंगळवारी (ता. ९) येथील रसवंतीगृह, शीतपेये, मसाले ताक, लिंबू शिखंजी, आईस्क्रीम, कुल्फी, बर्फगोळे आदी विक्रेत्यांच्या दुकानांवरील गर्दी वाढलेली दिसली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
टोपी, उपरणे, गॉगल आदींचा व्यवसायही वधारण्यास मदत झाली आहे. दरम्यान, बदलत्या वातावरणाचा हंगामी व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे.
ढगाळ वातावरण कायम
मालेगाव शहर व परिसरात उन्हाचा तडाखा वाढला असला तरी ढगाळ वातावरण कायम आहे. दिवसभर कडक ऊन पडते. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या वातावरणामुळे पुन्हा अवकाळी पाऊस होईल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसामुळे कसमादेतील उन्हाळी कांदा, भाजीपाला व फळ शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या संमिश्र वातावरण असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहे. दोन दिवसापासून मुंगसे बाजारात रोज १२ हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक आहे.