Nashik News : निराधारांसाठी मिळाला आधार! समाजकल्याण विभागातर्फे 1197 कोटींचा निधी | Support for needy 1197 crore fund by Social Welfare Department Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Welfare Department fund

Nashik News : निराधारांसाठी मिळाला आधार! समाजकल्याण विभागातर्फे 1197 कोटींचा निधी

Nashik News : समाजकल्याण विभागाने निराधारांसाठी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत ११९७ कोटींचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे.

संबंधित निधी तत्काळ लाभार्थ्यांना वाटप करावा, असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले. (Support for needy 1197 crore fund by Social Welfare Department Nashik News)

लाभाच्या दोन्ही योजनांतून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे, यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ४४५ कोटी, तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत ७५२ कोटी याप्रमाणे ११९७ कोटी निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना बुधवारी (ता. २४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरित करण्यात आला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत किमान १८ ते ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वतः चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला,

निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षांवरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना या योजनेचा लाभ मिळतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये एक हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतून दारिद्र्यरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या २१ हजारांहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यास दरमहा हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

"संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनांचे स्वरूप विचारात घेऊन यापुढील काळात योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरित होण्यासाठी लाभार्थींना लवकरात लवकर वाटप करण्याचे नियोजन करावे."

- सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय