
Electric Charging Station : ईलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी 20 ठिकाणी सर्वेक्षण
Electric Charging Station : वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांना बॅटरी चार्जिंग करण्यासाठी शहरात १०६ चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, त्याअनुषंगाने अंमलबजावणीचा भाग म्हणून मरिन इलेक्ट्रिसिटी बेजिलिफाय कंपनीकडून शहरात वीस ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (यूएनडीपी) अंतर्गत चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. (Survey of 20 locations for Electric Charging Station nmc nashik news)
केंद्र व राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी १०६ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ४० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.
चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिका स्वनिधी खर्च करणार आहे. यूएनडीपीमार्फत मरिन इलेक्ट्रिकल्स बेजीलिफाय कंपनी नियुक्त करण्यात आली आहे.
कंपनीच्या अभियंत्यांनी बुधवारी (ता. १२) विद्युत विभागाच्या अभियंत्यांसमवेत संयुक्त पाहणी केली आहे. यात चार्जिंग पॉइंटसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, चार्जिंग किटची संख्या, चार्जिंगची क्षमता, एकावेळी अनेक वाहने चार्जिंग आल्यास नियोजन, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी चार्जिंग पॉइंटची क्षमता यासंदर्भातील अहवाल तयार करून सादर केला जाणार आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत विद्युत व यांत्रिकी विभागाची बैठक झाली. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी एजन्सी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या. टाटा व रिलायन्स या कंपन्यांनाही चार्जिंग स्टेशनसाठी आमंत्रित केले जाणार आहे.
"इलेक्ट्रिक वाहन धोरणाला चालना देण्यासाठी पहिल्या टप्प्यात शहरात चाळीस ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. महिनाभरात प्रक्रीया पूर्ण केली जाईल."
- डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.