
Nashik Crime News : रेल्वेत चोरी करणारा संशयित गजाआड; 9 गुन्हे उघडकीस
Nashik Crime News : धावत्या रेल्वे गाडीमध्ये प्रवाशांच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन त्यांचे किमती मोबाईल आणि सामान चोरी करणाऱ्या संशयितास लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून ४ लाख २८ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अविनाश वाल्मीक घुले (रा. शिंगणापूर, ता. कोपरगाव) असे संशयिताचे नाव आहे. (Suspect of theft in train arested 9 Crime detection Nashik Crime News)
रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवाशांच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन किमती मोबाईल, सोन्याचे दागिने, पर्स, बॅगा चोरी केल्या जातात. कधी या चोरी उघडकीस येतात तर कधी प्रवासी तक्रार न देताच निघून जातात.
पण मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने गेल्या काही महिन्यात घडलेल्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध घेत तपास करून जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यासह एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणत संशयितास जेरबंद केले.
यावेळी मनमाड रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने दोन जबरी चोरीच्या गुन्ह्याबरोबर एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणले आहे.
एका गुन्ह्यामध्ये फिर्यादी महिला प्रवासी या मार्च महिन्यात पुणे ते काजीपेठ या गाडीने प्रवास करत होत्या. धावत्या रेल्वेत या महिलेची बॅग चोरीला गेली होती. तर चोरट्याने खिडकीतून हात घालून फिर्यादीच्या हातातून मोबाईल हिसकावून नेला.
सदर चोरीप्रकरणी पोलिसांनी शोध घेतला असता अविनाश वाल्मीक घुले (रा. शिंगणापूर, ता. कोपरगाव) याला अटक केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखी सहा मोबाईल चोरी करत विकल्याचे निष्पन्न झाले. सदर मोबाईलही पोलिसांनी जप्त केले. तर आठ गुन्हे उघड झाले. त्या गुन्ह्यातील सोने, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला.
या एकाच आरोपीकडून सुमारे ४ लाख २८ हजार ९२७ रुपये किमतीचा मुद्देमाल लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतला असून जबरी चोरीच्या गुन्ह्यासह एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणले आहे.
लोहमार्ग पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, कर्मचारी दिनेश पवार, हेमराज आंबेकर, संजय निकम, महेंद्रसिंग पाटील, सतीश भालेराव, प्रकाश पावशे, अमोल खोडके, किशोर कांडिले, राज बच्छाव आदींच्या पथकाने या कामी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.