Talabhishek : तालाभिषेक बैठकीत स्वप्नील भिसेंचे तबलावादन! कुसुमाग्रज स्मारकात संगीत मैफील | Swapnil Bhises tabla playing in Talabhishek baithak Music concert at Kusumagraj Memorial nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai's Swapnil Bhise playing the tabla during the talabhishek meeting held at the Kusumagraj memorial on Saturday.

Talabhishek : तालाभिषेक बैठकीत स्वप्नील भिसेंचे तबलावादन! कुसुमाग्रज स्मारकात संगीत मैफील

Talabhishek : येथील कुसुमाग्रज स्मारकामध्ये शनिवारी (ता. १३) सायंकाळी झालेल्या तालाभिषेक बैठकीमध्ये नाशिकमधील आरोह यांचे गायन आणि मुंबईचे स्वप्नील भिसे यांचे तबलावादन झाले.

पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल ॲन्ड कल्चरल फाउंडेशनतर्फे व कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ही संगीत मैफील झाली. (Swapnil Bhises tabla playing in Talabhishek baithak Music concert at Kusumagraj Memorial nashik news)

संगीततज्ज्ञ डॉ. संजीव शेलार, निरंजन सोनवणे, सपना खैरनार, संजीवनी देसाई, डॉ. अविराज तायडे, प्रा. नितीन पवार, रघुवीर अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. डॉ. तायडे यांनी स्वागत केले. श्री. अधिकारी यांनी प्रास्ताविक केले.

लातूरच्या मराठवाडा संगीत अकादमी संस्थेतर्फे श्री. अधिकारी, मनीषा अधिकारी यांना अभिजात संगीत कलेचा प्रचार व प्रसारासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याने ‘संगीत रसिकाग्रणी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पवार तबला अकादमीतर्फे त्यांचा विशेष सत्कार संचालक श्री. पवार यांच्या हस्ते झाला.

मैफिलीच्या पूर्वार्धात पंडित चंद्रकांत भोसेकर, प्रवीण करकरे, पंडित योगेश सम्सी यांचे शिष्य स्वप्नील यांचे एकल तबलावादन झाले. त्यांना प्रशांत महाबळ यांनी संवादिनी साथ केली. उत्तरार्धात प्रा. अविराज तायडे व पंडित उल्हास कशाळकर यांचे शिष्य आरोह यांचे शास्त्रीय गायन झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी गायनाची सुरवात मारवा रागातील एकतालात निबद्ध असलेल्या ‘बीत गयी मोरी रैना’ या बडा ख्यालाच्या बंदिशीने केली. त्यानंतर याच रागातील प्रसिद्ध अशी ‘हो गुणीजन मिल’ ही द्रुत एकतालातील बंदिश सादर केली. तिलक कामोद रागातील ‘तिरथ सब करे’ ही झप तालातील बंदिश सादर केली.

याच रागातील द्रुत एकतालातील तराणा ‘तनोम तनन तनोम तनन’ याने मैफिलीची सांगता केली. त्यांना दिव्या रानडे (संवादिनी) आणि सारंग तत्त्ववादी (तबला) यांनी साथसंगत केली. अमित भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. ध्वनी संयोजन सचिन तिडके यांचे होते.

टॅग्स :Nashikart