Bribe News: लाचखोर तलाठी जेरबंद; सात-बारा उताऱ्यावर नावनोंदणीसाठी केली लाच मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bribe

Bribe News: लाचखोर तलाठी जेरबंद; सात-बारा उताऱ्यावर नावनोंदणीसाठी केली लाच मागणी

नाशिक/चांदोरी : सातबारा उताऱ्यावर नावनोंदणीसाठी पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दावचवाडीच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. महेश सहदेव गायकवाड (वय ४३) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या आत्याने तक्रारदार, तसेच त्यांच्या वडिलांच्या नावे मौजे नागापूर (ता. निफाड) येथील गट नंबर ३३७ अन्वये एक हेक्टर तीन आर, तसेच गट नंबर ३३९ अन्वये एक हेक्टर पाच आर. अशी शेती मृत्युपत्र करून लिहून दिली होती.

याबाबत त्यांनी निफाडच्या दुय्यम निबंधकांकडे दस्तनोंद केला होता. त्या अनुषंगाने लाचखोर तलाठी गायकवाड याच्याकडे केलेल्या अर्जान्वये तक्रारदार व त्यांचे वडील यांचे नाव सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी त्याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि लाचेची रक्कम पंच, साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली असता लाचखोर तलाठ्याला अटक करण्यात आली.

लाचखोर तलाठी गायकवाड याच्याकडे चितेगावचाही अतिरिक्त कार्यभार होता. याप्रकरणी निफाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी बजावली.