
Nashik News : डिजे, बॅण्डमुळे ताशा, संबळ कालबाह्य होण्याच्या मार्गावर; कलावंतावर उपासमारीची वेळ
Nashik News : बदल्या काळानुसार आता प्रत्येक व्यवसायात नवनवीन स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बदल स्वीकारताना जुन्या अनेक व्यवसाय मागे पडले आहे.
याची झळ ढोल-ताशा, झांज पथक, संबळ, बँजो, बॅन्ड पथकातील विविध वाद्य वाजविणाऱ्या कलाकारांना देखील बसली आहे. कारण आता पारंपारिक वाद्यांना पर्याय म्हणून डिजे अस्तित्वात आल्यापासून या सर्व वाद्यांना मोठ्या प्रमाणात घरघर लागली आहे.
डिजेने तरुणाईला भुरळ घातल्याने पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. (Tasha Sambal on verge of expiry due to DJ band Starving time on artist Nashik News)
पुर्वी लग्न समारंभ म्हटले की, सुपारी फोडण्याचा कार्यक्रमापासून, साखरपुडा, वधू-वर यांना हळद लावणे, गावात अक्षदा वाटणे, लग्न समारंभवर वधूची हळद उतरवून त्यांना वाजतगाजत ग्रामदेवतांचे दर्शन होईपर्यंत ढोल ताशांच्या एका वाद्याच्या पथकास (सरासरी आठ वाद्य कलाकार) ५ दिवस काम मिळे.
त्या मोबदल्यात कार्यक्रम सुरु झाल्यापासून शेवटपर्यंत दोन वेळच्या जेवणासह त्यांना पाच ते आठ हजार रुपये मेहनताना मिळत होता.
शिवाय ओवाळणी वेगळी असायची. लग्नसराई व्यतिरिक्त गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व धार्मिक कार्यक्रमात संबळ असायचे. ढोल ताशा लावून आनंदोत्सव साजरा होत असे. अबाल वृध्द सर्वच त्याचा आनंद लुटायचे.
यासाठी नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील संबळ प्रसिद्ध होते. येथे तीन पथक होते. त्यांना तालुक्यासह नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, नगर यासह विविध जिल्ह्यातून मागणी होती. एका संबळ पथकात संबळ व सनई वाजविण्यासाठी प्रत्येकी दोन, एक सुरु लावणारा असे पाच जणांचे पथक असायचे.
परंतु मागील दहा ते बारा वर्षापासून या व्यवसायाला डीजे आल्यापासून घरघर लागली आहे. डिजेमुळे त्यांचा रोजगार मोठ्या प्रमाणात हिरावला गेला आहे. त्यामुळे हे वाद्य वाजविणाऱ्या अनेक कलावंतावर आता उपासमारीचे वेळ आलेली आहे.
वर्षात एक किंवा दोन मंगल कार्यांना बोलविण्याची वेळ जातेगाव येथील कलावंतावर आलेली आहे. त्यामुळे या वाद्यांना सांभाळून ठेवण्याचा खर्च देखील निघत नसल्याचे येथील कलावंत सांगत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यापुर्वी जातेगाव, बोलठाण येथे ढोल ताशा झांज वाजविणारे व संबळ, बॅंजो वाजविणारे शंभर कलाकार होते. काळाच्या ओघात हे वाद्य दुर्लक्षित झाल्याने नवीन कलाकार तयार झाले नाही. सध्या महागाई गगनाला भिडल्यामुळे कोणत्या एखाद्या धार्मिक कार्यास किंवा लग्न समारंभासाठी ढोल ताशा पथकाचे कुणी चौकशी केली तर त्या प्रमाणात मानधन मिळत नाही.
त्यामुळे बाहेरील ढोल ताशा वाजवणारे बाहेरील कामगार बोलविण्यासही परवडत नाही. दहा वर्षापूर्वी जातेगाव, बोलठाण येथील ढोल ताशा झांज पथकांना पुणे, मुंबई, छत्रपती संभाजी नगर, नाशिक येथे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मिरवणुकीसाठी एक महिना अगोदर इसार देवून निश्चित केले जात. आता या उत्सवाचे काम मिळत नाही. अनेकांनी आता वाद्य आठवण किंवा लक्ष्मी म्हणून सांभाळून ठेवले आहे.
"दशकात डिजेसह नवनवीन वाद्य प्रकार विकसित झाले. त्याची तरुणाईची त्याला भुरळ पडली. पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. नवीन पद्धतीचे डिजे व इतर साहित्य विकत घेण्याची आमची आर्थिक परिस्थिती नाही. जे वाद्य आहे ते चालेल तोपर्यंत काम करु. सध्या किरकोळ काही कार्यक्रम असला तर एकाच व्यक्तीला बोलविले जात आहे."
- मोहंमद उस्मान शेख, ढोल ताशा पथकाचे संचालक