NMC Recruitment : भरतीसाठी TCS ने प्रस्ताव स्वीकारला; महापलिका प्रशासनाकडून नियम, अटी सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC

NMC Recruitment : भरतीसाठी TCS ने प्रस्ताव स्वीकारला; महापलिका प्रशासनाकडून नियम, अटी सादर

नाशिक : महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदासाठीच्या भरतीची प्रक्रियेसाठी महापालिकेने टीसीएस कंपनीला दिलेला प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे.

नियम व अटी महापालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आल्या आहेत. यापूर्वी आयबीपीएस संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबविली जाणार होती. परंतु, असमर्थता दर्शविण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला नोकर भरतीचा प्रस्ताव सादर केला. (NMC TCS Accepted Proposal for Recruitment Rules conditions submitted by NMC administration nashik news)

शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची गरज असताना २४ वर्षांपासून महापालिकेत कुठलीही नोकरभरती झाली नाही.

महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार निवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या २६०० वर गेली.

महापालिकेत सद्यःस्थितीत जेमतेम ४५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला. शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकर भरतीला अडचणीची ठरत आहे.

परंतु, कोरोना काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतिबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली होती.

परंतु,सन २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती. अखेरीस नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) मार्फतच भरतीच्या सूचना दिल्या. त्यानुसार आयबीपीएसने प्रथम प्रस्ताव स्वीकारला. कराराच्या अटी व शर्तींवर स्वाक्षरी करण्याची वेळ आल्यानंतर अकार्यक्षमता दर्शविण्यात आली. त्यामुळे टीसीएसकडे प्रस्ताव सादर केला.

कालबाह्य ५११ पदे रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महापालिका आयुक्तांच्या घेतलेल्या बैठकीत रिक्त पदांची भरती करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने सेवा व शर्ती नियमावली मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार नाशिक महापालिकेत सुधारित पदांचा आराखडा तयार करताना प्रशासनाने 11 विभागांच्या सेवा व शर्ती नियमावलीत बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. काळाची गरज ओळखून ज्या पदांची आवश्यकता नाही.

अशी पदे रद्द करण्यात आली आहे. जवळपास कालबाह्य ठरणारी ५११ पदे रद्द करण्यात आली. बिगारी संवर्गातील 362 पदे, खत प्रकल्पावरील 84 पदे तसेच अन्य विभागातील पदे कालबाह्य ठरविण्यात आली. सुरक्षारक्षकांच्या मध्ये वॉचमन संवर्गातील ११६ पदे समायोजित करण्यात आली. माळी संवर्गातील ६४ पदे मंजूर आहेत.

"टीसीएस संस्थेमार्फत नोकर भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिकेचा प्रस्ताव संस्थेने मान्य केला आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने व आयुक्तांच्या निर्देशानुसार नोकरभरतीचा प्रक्रिया राबविण्यात येईल."

- मनोज घोडे- पाटील, प्रशासन उपायुक्त.

टॅग्स :NashikRecruitmentnmcTCS