शिपाई ते विद्यार्थिप्रिय शिक्षक, कवी, गझलकार कमलाकर देसले यांचे निधन

मालेगावी शुक्रवारी (ता. ३) रात्री सव्वादहाच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.
Kamlakar Desale
Kamlakar Desaleesakal

झोडगे (जि. नाशिक) : प्रसिद्ध कवी, गझलकार कमलाकर आत्माराम देसले (वय ५९) यांचे मालेगावी शुक्रवारी (ता. ३) रात्री सव्वादहाच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. झोडगे येथील जनता विद्यालयाचे शिक्षक म्हणून मागील वर्षीच निवृत्त झाले होते.

ज्ञानेश्वरी, तुकारामांच्या गाथा व अभंगावर ते प्रवचने देत. विविध शाळा-महाविद्यालयांत विविध विषयांवर व्याख्याने देत असत. ‘सकाळ’, ‘अॅग्रोवन’सह विविध वृत्तपत्रांमधून विविध विषयांवरील त्यांचे लेख, सदरे प्रसिद्ध झाली असून, काही सुरू आहेत. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर केल्या होत्या. ‘काही श्र्वास विश्वासाठी’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. त्यांना महाकवी कालिदास, बालकवींसह साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले होते. साहित्य चळवळीत सहभागी होऊन लेखनातून आपली ओळख त्यांनी निर्माण केली होती. त्यांच्या आवाजातील पसायदान ऐकून विद्यार्थी व रसिक मंत्रमुग्ध होत. त्यांच्या मागे पत्नी प्रतिभाताई, मालेगाव येथील वर्धमान शाळेतील शिक्षक तथा पत्रकार तुषार देसले व ज्ञानेश्वर देसले ही मुले असा परिवार आहे.

Kamlakar Desale
तहानलेल्या मोराचा पाण्याच्या शोधात विहिरीत पडून मृत्यू

शिपाई ते विद्यार्थिप्रिय शिक्षक

झोडगे (ता. मालेगाव) येथील जनता विद्यालयात शिपाई म्हणून कामकाज सुरू करून विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून कीर्ती प्राप्त करणाऱ्या कमलाकर देसले यांनी महाराष्ट्रातील नामवंत कवी म्हणून नावलौकिक मिळविला. ते अतिशय गुणग्राहक होते. ग्रामीण भागात राहूनही त्यांचा राज्यभर मित्रपरिवार होता. राज्यातील अनेक नामवंत कवींच्या समवेत त्यांनी काव्य मैफलीत भाग घेतला.
स्वकर्तृत्वावर मोठं झाल्यावरही जमिनीवर पाय असलेले व मातीशी नाळ जोडलेले कमलाकर देसले (आबा) या टोपणनावाने ओळखले जात. कवितेसोबतच ते उत्तम गद्यलेखन करीत. त्याचे ज्ञानीया तुझे पायी, श्वास निःश्वास हे काव्यसंग्रह, तर बिंब-प्रतिबिंब हा पत्रसंग्रह प्रसिद्ध होता. अनेक नियतकालिकांत त्यांनी स्तंभलेखन केले. ज्ञानेश्वरीसह इतर अनेक विषयांवर ते व्याख्याने देत. गजल लेखनात त्यांनी उत्तुंग यश मिळविले होते. वृक्ष, माती, पाणी, ग्रामीण भागातील जीवन हे त्यांचे आवडीचे विषय होते.

''एक आगळंवेगळं शेकडो पैलू असलेलं व्यक्तिमत्त्व हरपलं. ते शहर व तालुक्याची शान होते. ग्रामीण भागातून पुढे येत कवी, गझल, साहित्य क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमावले होते. एक सच्चा माणूस हरपला. व्याख्यानमाला व विविध सभा, समारंभातून ते समाजाला दिशा देण्याचे काम करीत होते. आत्ताच रुग्णालयात त्यांचे अंत्यदर्शन घेतले.'' - दादा भुसे, कृषिमंत्री

''कमलाकर देसले गझलेला आदराचे स्थान निर्माण करणारे सारस्वताचे सच्चे सेवक होते. नवकवींना उभारी देणारा उमदा माणूस गमावला.'' - डॉ. एस. के. पाटील, अहिराणी कवी, दाभाडी

Kamlakar Desale
तहानलेल्या मोराचा पाण्याच्या शोधात विहिरीत पडून मृत्यू

''दर्दी वाचक, उत्तर महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, साहित्यासह सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रात अभ्यासपूर्ण शैलीत निरूपण करणारा प्रवचनकार, उत्तम कवी व कोवळ्या मनाचा थोर कवी हरपला.'' - भिला महाजन, वात्रटिकाकार, मालेगाव

''भला माणूस हरपला. मालेगावच नव्हे तर अवघ्या राज्यभर मित्रपरिवार जोडणारा प्रतिभावंत साहित्यिक कमलाकर देसले यांच्या आकस्मिक निधनाने पोरके झाले आहे. सुंदर हस्ताक्षर, उत्तम गायन, वादन सुरेख, ओरेगामी कला असा विविध कालागुणी काळाने ओढून नेला आहे.'' - विनोद गोरवाडकर, साहित्यिक, मालेगाव

''निरलस, निरपेक्ष, सज्जन माणूस. प्रामाणिक मार्गदर्शक हरपला. तुकोबांच्या भेटीला वारकरी निघाला वैकुंठाला.'' - राकेश भामरे शहराध्यक्ष, मनसे

''ग्रामीण भागात काम करीत, वाचनातून समृद्ध झालेली व्यक्ती. त्यांनी कविता, गझल, व्याख्यान, साहित्य या क्षेत्रात खूप मोठे नाव केले होते. त्यांच्या कार्याला सर्वांनी सलाम केला होता. त्यांचे अकाली जाणे मनाला वेदना देऊन गेले.'' - डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com