
Nashik News: बदली प्रक्रियेविरोधात शिक्षकांचा एल्गार! ZPत ठिय्या; न्यायालयात जाण्याचा एकमुखी निर्णय
नाशिक : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे पाच टप्पे पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील शाळांमधे रिक्त असलेल्या ३२७ शिक्षकांसाठी टप्पा सहा अंतर्गत बदली करण्याचा घाट ग्रामविकास विभागाने घातला आहे.
हा टप्पाच बेकायदेशीर असून, तो तत्काळ रद्द करून शिक्षकांची बदली प्रक्रिया थांबवावी, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शिक्षकांनी सोमवारी (ता. १३) जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. (Teachers protest against transfer process Stay in ZP Unilateral decision to go to court Nashik News)
जिल्हा परिषदेच्या एकूण तीन हजार २७९ शाळांची अवघड व सर्वसाधारण क्षेत्रात विभागणी झाल्यानंतर तेथील शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवण्यात आली. यात संवर्ग एक अंतर्गत ३४८, संवर्ग दोन अंतर्गत २०१ शिक्षकांची बदली झाली. त्यानंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची प्रक्रिया राबवण्यात आली.
यात ३३४ शिक्षकांची बदली झाली. यानंतर बदलीपात्र असलेल्या ९०५ शिक्षकांची बदली झाली. प्रक्रियेतील सर्वांत शेवटचा टप्पा म्हणून ३२ विस्थापित शिक्षकांची बदली करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊनही अवघड क्षेत्रातील शाळांमधील ३२७ जागा रिक्त राहिल्या आहेत.
त्या भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रातील, म्हणजेच आदिवासी तालुके वगळता अन्य तालुक्यांमधील शिक्षकांची बदली करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे आता बारावी विज्ञानचे शिक्षक असतील किंवा २०१९ च्या बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रिकरणामुळे एका ठिकाणी आलेले शिक्षक विभक्त होणार आहेत.
अशा सर्व शिक्षकांनी आता याविरोधात एल्गार पुकारला असून, त्यांनी प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्याशी चर्चा केली.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
या शिक्षकांनी मांडलेले मुद्दे योग्य वाटत असले, तरी जिल्हा स्तरावर याबाबत निर्णय घेता येणे शक्य नसल्याचे या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे टप्पा सहाअंतर्गत राबविण्यात येणार असलेली ऑनलाइन प्रक्रिया रद्द करण्यासाठी या शिक्षकांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे यांच्यासह महिला व पुरुष शिक्षक उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्र्यांवर आगपाखड
संभाव्य बदली रोखण्यासाठी या शिक्षकांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यासमोर जाताच त्यांनी, तुम्ही बदलीसाठी आला आहात का? असा उपरोधिक प्रश्न विचारून आम्हाला पालकमंत्र्यांकडे जायला भाग पाडले.
मुळात त्यांच्या विभागाचा प्रश्न असताना त्यांनी आमची अशा पद्धतीने बोळवण केल्याची भावना महिला शिक्षिकेने या वेळी व्यक्त केली.
"शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री यांना भेटून ऑनलाइन बदली प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून दाद मिळत नसल्याने आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांना न्याय मिळवून देऊ."- प्रशांत शेवाळे, शिक्षक