Nashik Crime News : सिडकोत टोळक्यांची दहशत; नागरिकांच्या घरावर दगडफेक अन् वाहनांची तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : सिडकोत टोळक्यांची दहशत; नागरिकांच्या घरावर दगडफेक अन् वाहनांची तोडफोड

सिडको (जि. नाशिक) : उदय कॉलनी तोरणानगर परिसरात मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने संपूर्ण परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी (ता. २) मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच जणांच्या मद्यपी टोळक्याने येथे उदय कॉलनी तसेच तोरणानगर येथील चौकात शिवीगाळ करण्यास सुरवात केली. एवढेच नाही तर हातात दगडे घेऊन नागरिकांच्या घरावर दगडफेक केली.

यानंतर रस्त्याने नागरिकांनी घरासमोर लावलेल्या दुचाकी भररस्त्यात पाडून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. (Terror in cidco of gangs Stone pelting on citizens houses vandalizing of vehicles Nashik Crime News)

टोळक्यास हटकण्यासाठी गेलेल्या प्रवीण घोरपडे नामक युवकांवर गावगुंडांनी त्याच्या घरात घुसून डोक्यात मारहाण करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, पोलिस वाहनाचा आवाज येताच या टोळक्याने पळ काढला. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलिस उपायुक्तांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. या आधी सिडकोतील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी तत्कालीन पोलिस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी कंबर कसली होती.

स्वतः थेट रस्त्यावर उतरून कार्यवाही करत असल्याने गुन्हेगारी मोडीत काढण्यात त्यांना यश मिळाले होते. गेल्या वर्षभरापासून तोरणानगर भागात तसेच उदय कॉलनी परिसरात एटीएम कट्टा गॅंगने दहशत वाजवली आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

या गॅंगमधील टोळके मनपा मैदानावर सकाळ, सायंकाळ मद्यपान करण्यास जमलेले असतात. नशेच्या धुंदीमध्ये हे गुंड नागरिकांना शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यापूर्वीदेखील या गुंडांनी घरात घुसून एका कुटुंबीयांना मारहाण करत गंभीर जखमी केले होते.

विविध गँग पुन्हा सक्रिय

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गँग पुन्हा सक्रिय होत असून, या आधी सिडको परिसरात टिप्पर गँगची मोठी दहशत होती. नव्याने वाय गँग, गॅस गँग, बोंबील गँग सक्रिय होत असून यांचा स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Nashikcrime news in beed