YCMOU : मुक्‍त विद्यापीठाचे कार्य आंतरराष्ट्रीय स्‍तरावर पोहोचविणार; डॉ. संजीव सोनवणे यांची ग्‍वाही | Testimony of dr Sanjeev Sonawane take work of Open University to international level nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwantrao Chavan Maharashtra Open University Vice-Chancellor Dr. While accepting from Prashant Kumar Patil, the newly appointed Vice-Chancellor Prof. Dr. Sanjeev Sonwane.

YCMOU : मुक्‍त विद्यापीठाचे कार्य आंतरराष्ट्रीय स्‍तरावर पोहोचविणार; डॉ. संजीव सोनवणे यांची ग्‍वाही

YCMOU : दूरशिक्षणातून गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सर्वदूर विस्‍तार केलेला आहे. विद्यार्थीभिमुख धोरणांची आखणी व अंमलबजावणीवर भर असेल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील गरज ओळखून अभ्यासक्रमांची पुनर्रचना, रोजगाराभिमुख शिक्षणक्रम आणि पदवी शिक्षणक्रम ऑनलाइन स्वरूपात सुरू केले जातील.

आंतरराष्ट्रीय व्‍याप्ती वाढविण्याची क्षमता विद्यापीठात असून, त्‍यादृष्टीने वाटचाल केली जाईल, अशी ग्‍वाही नवनियुक्‍त कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी मंगळवारी (ता.२३) दिली. (Testimony of dr Sanjeev Sonawane take work of Open University to international level nashik news)

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्‍याकडून डॉ. सोनवणे यांनी पदभार स्‍वीकारला. वर्षभराहून अधिक कालावधीपासून कुलगुरुपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्‍या डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना यावेळी निरोप देण्यात आला.

डॉ. सोनवणे म्‍हणाले, की मुक्त विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू दिवंगत डॉ. राम ताकवले यांनी सुरू केलेली ही शिक्षणाची गंगोत्री समृद्ध झालेली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणक्रमांची व्याप्ती अधिकाधिक वाढविण्यावर भर असेल.

संशोधनाला पैसे लागतात, ही धारणा बदलण्याची गरज आहे. स्थिती, संबंध, कारण आणि परिणाम या तत्त्वांच्या आधारे संशोधन प्रणालीकडे बघितले पाहिजे. अभिमानाने सांगता येईल, अशी संशोधन क्षेत्रात स्‍थिती येत्‍या वर्षभरात विद्यापीठ गाठेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

सध्याच्या महागाईच्‍या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सर्वसाधारण घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा विचार करावा लागेल. तंत्रज्ञानाच्या आधारे ऑनलाइन शिक्षणक्रम सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांपर्यंत पोहोचायचे आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची क्षमता विद्यापीठात आहे. त्‍याअनुषंगाने सूक्ष्म नियोजनातून विकास आराखडे आखले जाऊन विद्यापीठाच्या आगामी वाटचालीची दिशा ठरवली जाईल.

डॉ. प्रशांतकुमार पाटील म्‍हणाले, की विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजातील समस्या सोडविता आल्या. 'नॅक'सारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेतून विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळवून देता आल्‍याचे समाधान वाटते. वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतांना त्‍यांनी डॉ.सोनवणे यांचे स्‍वागत व शुभेच्‍छा दिल्‍या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम, शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालक डॉ. कविता साळुंके, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात सुनील साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. उपकुलसचिव डॉ. कैलास बोरसे यांनी आभार मानले.

शैक्षणिक धोरणात दूरस्‍थ शिक्षणाला महत्त्व

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दूरस्‍थ शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. त्‍यामुळे विद्यापीठाला प्रचंड संधी असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. विद्यापीठाचा मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्‍न असेल.

भरतीप्रक्रियेवर काम सुरू करताना टप्प्याटप्प्याने प्रक्रिया आगामी काळात राबविली जाईल, असे त्‍यांनी सांगितले.

टॅग्स :YCMOU