
Nashik Crime News : चोरट्यांचा द्राक्षांवर डल्ला; कोकणगावच्या शेतकऱ्याचे नुकसान
कोकणगाव (जि. नाशिक) : काढणीसाठी आलेल्या द्राक्षावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे घडली. या घटनेमुळे आता शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. (Thieves stolen grapes loss of farmer of Kokangaon Nashik Crime News)
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
याबाबत माहिती अशी की, कोकणगाव येथील प्रगतिशील शेतकरी केशवराव मोरे यांची जम्बो व्हरायटीची द्राक्षबाग आहे. सोमवारी रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी द्राक्षबागेत प्रवेश करीत १५ ते २० क्विंटल द्राक्ष तोडून नेले.
सकाळी द्राक्ष काढणीसाठी मजूर येणार होते. पण, त्याआधीच चोरट्यांनी हात साफ केला. चोरी गेलेल्या द्राक्षाची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे दीड लाख रुपये किंमत होती. अस्मानी संकट, त्यातच चोरट्यांचा धुमाकूळ यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात अजूनच भर पडली आहे.
द्राक्षाची छाटणीपासून विक्रीपर्यंत लहान मुलासारखी जोपासना केली जाते. परंतु, मध्येच येणार्या संकटामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पिंपळगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.