
Nashik News : तिघा निराधार भावंडांना मिळाली सायखेडा पोलिसांमुळे ‘सावली’!
Nashik News : भेंडाळी (ता. निफाड) येथे आश्रयाच्या शोधात आलेल्या तीन बालकांना मायेची सावली लाभली असून, त्यांना नाशिकच्या उंटवाडी रोडवरील बालगृहात पोचविण्यात आले आहे. (three destitute siblings got shelter because of Saikheda Police Nashik news)
या संदर्भात नाशिक येथील चाईल्ड हेल्प लाईनकडून सायखेडा पोलीस ठाण्यात दुरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली होती. त्यानुसार रविवारी (ता. ७) सायंकाळी सातच्या सुमारास भेंडाळी गावात तीन लहान मुले सापडली असून, त्यांना मदत करावी असे सांगण्यात आले.
त्यावर सायखेडा पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही तीन बालके आढळून आली. त्यांना ताब्यात घेऊन सायखेडा पोलिस ठाण्यात आणत चौकशी केली असता, त्यांची सविस्तर माहिती मिळाली.
त्यानुसार हे तिघेही सख्खे भावंडे असून, कृष्णा मोरे (वय १६), विजय मोरे (वय १५) व आकाश मोरे (वय ११) अशी त्यांची नावे आहेत. ते सोमठाणे (ता. सिन्नर) येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील युवराज रामभाऊ मोरे यांचे साधारण दीड वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले आहे.
तर, त्यांची आई शितल ही दहा वर्षांपूर्वीच घर सोडून निघून गेलेली आहे. हे तिघेही साधारणत: ४ ते ५ वर्षांपासून पंचाळे (ता. सिन्नर) येथील राजेंद्र कचरू फटांगरे यांच्याकडे राहात होते. तेथे कंटाळा आल्याने आठवड्यापूर्वी ते भेंडाळी येथे कैलास लक्ष्मण डहाळे यांच्या घरी आश्रयास आले होते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
दरम्यान, पद्मादित्य कापड दुकानदार नाना खैरनार यांनी या तिघांनाही नवीन कपडे देत त्यांची आस्थेने विचारपूस केली. सध्या कोणीही त्यांना सांभाळण्यास तयार नसल्याने व कुणी नातेवाईकही नसल्याने त्यांना आश्रयाची नितांत गरज आहे.
त्यामुळे त्यांना नाशिकला बालगृहात पाठविण्यात आले आहे. सायखेडा पोलिस ठाण्याचे पी. वाय. कादरी, शाहीन कादरी, पोलीस नाईक मोठाभाऊ जाधव, प्रकाश वाकळे, सुनीता घोडके, सुदाम भांबळे, प्रकाश कुटे आदी या वेळी उपस्थित होते.
"सायखेडा पोलिसांच्या माध्यमातून तीन निराधार बालकांना मायेची सावली मिळाली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेबरोबरच आपल्या कृतीतून पोलिसांनी नागरिकांची मने जिंकली आहेत." -अनिकेत कुटे, जिल्हा प्रमुख, शिवसेना वैद्यकीय कक्ष