Paramedical Course: पॅरामेडीकल अभ्यासक्रमातून आदिवासींच्या जगण्याला बळ, शिक्षणाकडे तरूण-तरूणींचा वाढला कल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paramedical Course

Paramedical Course: पॅरामेडीकल अभ्यासक्रमातून आदिवासींच्या जगण्याला बळ, शिक्षणाकडे तरूण-तरूणींचा वाढला कल!

पेठ (जि. नाशिक) : पॅरा मेडिकल अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आदिवासी भागातील तरुण-तरुणीच्या हाताला काम मिळाल्याने आर्थिक उन्नतीबरोबरच समाजात मानाने जगण्याचे बळ मिळाले आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक तरुण-तरुणी पॅरामेडिकल शिक्षणाकडे वळाले आहेत. (Through paramedical course survival of tribals is strengthened tendency of young people towards education increased nashik news)

तालुक्यात खासगी संस्थेच्या माध्यमातुन पॅरा मेडीकलचे जनरल नर्सिंग, असिस्टंट नर्स व मिड वायफरी, एक्स-रे टेक्नीशियन, ऑपरेशन थिएटर असिस्टट आदी अभ्यासक्रम चालवून आदिवासी मुला-मुलींना व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवाहात आणले.

सदर मुलांना पेठ येथील ग्रामिण रुग्णालयात प्रात्यक्षिकांची सुविधा देण्यात येते. विद्यार्थांमध्ये कौशल्य विकसित करुन मानव संसाधन धोरणांची जाणिव विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागते. गेल्या सात वर्षात सुमारे ५०० ते ६०० विध्यार्थी आरोग्य सेवेत आरोग्यवर्धन, रोगप्रतिबंधन, आरोग्य रक्षण, तसेच रुग्णसेवेचे कार्य करतात.

पेठ तालुक्यात बोटावर मोजण्या इतकी सरकारी रुग्णालये असून, खासगी रुग्णालये उभी राहिलेली नाहीत. परिणामी शिक्षण घेतलेल्या तरुणांना शहराची वाट धरत गुजरातमधील धरमपूर, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी येथे जाऊन नोकरीवजा सेवा बजवावी लागते.

मात्र, हाताला रोजगार मिळाल्याने उपजिविकेबरोबरच अर्थिक उन्नती साधत समाजात सन्मानाने जगता येते. हा अभ्यासक्रम सेवाभावी व्यवसायाची दिशा देतो. मात्र, आपण करीत असलेल्या कामाचे समाधान रुग्णांच्या चेहऱ्यावर लगेच प्रकट होत असल्याने, याचा आनंद या तरुणांमध्ये दिसून येतो.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

अॅकेडमी शिक्षणातून आधुनिकतेची व्याख्या बदलत असली, तरी स्थानिक रोजगार उपलब्ध होत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी रोजंदारी करावी लागते. इयता १० व १२ वी सायन्सनंतर तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण घेतल्यास स्वत:चा व्यवसाय, अथवा खासगी रुग्णालयात रोजगार उपलब्ध होत असल्याने आदिवासी मुला-मुलींचा कल पॅरामेडिकल झुकलेला दिसतो.

२०२२-२३ या वर्षात पेठमधील सेवा नर्स अॅन्ड पॅरा मेडिकल संस्थेतर्फे चालविल्या जाणारे अभ्यासक्रम व प्रवेशित मुले-मुली

जीएमएम कोर्स : ३ मुली व ३ मुले

एएनएम कोर्स : १५ मुली

ओटी कोर्स : १७ मुले

लॅब टेक्निशियन : ८ मुली व २ मुले

सदरचा कोर्स इयता १० वी व १२ वी सायन्सनंतर देण्यात येतो.

"आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची क्षमता असून, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते शिक्षणासाठी कुठेही जाण्यास तयार असतात. गरीबी पाचवीला पुजलेली असल्याने पॅरा मेडिकलसारखे तांत्रिक कौशल्य आत्मसात करून, कमी कालावधीत कुंटुबाचा आर्थिक भार उचलतात. बचत गटाच्या माध्यमातुन पॅरामेडिकल कॉलेजचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे." - माधुरी गाडगीळ, संस्थापक, महालक्ष्मी बचतगट