
Farmer News : टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख घेऊन पसार; शेतकरी हवालदिल
पंचवटी : शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी एक कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला. हे टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे न देता फरारी झाल्याने सोमवारी (ता. २७) शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांना निवेदन देत पैसे मिळून देण्याची मागणी केली. या व्यापाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल झाली.
पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात जिल्ह्याभरातील विविध भागांतून टोमॅटो विक्रीसाठी येतो. टोमॅटो खरेदीदार व्यापाऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून शेतकऱ्यांना टोमॅटोची रक्कम दिली जाते. टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी व समशाद फारुकी यांनी सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२२ यादरम्यान शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केले.
मात्र, त्याचे पैसे दिले नाहीत. ज्या शेतकऱ्यांना त्यांनी धनादेश दिले, ते धनादेश त्याच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने बाऊन्स झाले. या व्यापाऱ्याकडून १७९ शेतकऱ्यांना सुमारे एक कोटी ८० लाख रुपये घेणे बाकी आहे.
व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. ते सध्या फरारी आहेत. व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे गाळे व मालमत्तांचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी आहे.
''मोठ्या कष्टाने पिकविलेला टोमॅटो व्यापाऱ्याने खरेदी केला. त्याचे पैसे अजूनही दिले नाहीत. बाजार समिती प्रशासनाने आम्हा शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे.'' - संजय काकड, शेतकरी, मखमलाबाद.
''बाजार समितीत आयटीसी ट्रेडिंग कंपनीत टोमॅटो दिला होता. पैसे मिळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने पुढाकार घ्यावा.'' - संतोष सानप, शेतकरी, सिन्नर
''संबंधित व्यापाऱ्याला बाजार समिती प्रशासनाने नोटीस दिली आहे. मात्र व्यापाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदविली आहे.'' - अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती
बाजार समिती प्रशासनाच्या हालचाली
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनास या प्रकरणी माहिती उपलब्ध झाली. व्यापाऱ्याने विकलेला गाळा ताब्यात घेतला, त्याची विक्रीप्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, व्यापारी आपल्या खासगी मिळकती विकत असल्याबाबत बाजार समितीस माहिती मिळताच दस्त नोंदणी कार्यालयात पत्रव्यवहार करीत माहिती मागवली आहे.
याबाबत माहिती उपलब्ध करून बाजार समिती कायद्यांतर्गत ५७ अ प्रमाणे कारवाई करणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.