Nashik News : उन्हामुळे अडकले ट्रॅफिक काउंट | Traffic count stuck due to heat nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident Black Spot

Nashik News : उन्हामुळे अडकले ट्रॅफिक काउंट

Nashik News : मुंबई नाका चौकातील वाहतूक सर्वेक्षणासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी पुढे येत नसल्याचे समोर आहे. त्याला कारण म्हणजे तीव्र उन्हाच्या झळा लागत असल्याने महाविद्यालयाकडून नकार दिला जात असल्याची बाब समोर आली आहे. (Traffic count stuck due to heat nashik news)

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातात प्रवासी जळून मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देण्याबरोबरच शहरातील वाहतुकीचे ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर तातडीने कारवाई करण्याचे सूचना दिल्या.

त्याअनुषंगाने नाशिक महापालिका, वाहतूक पोलिसांच्या रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये मुंबई नाका सर्कल येथे वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई नाका चौकात दोन अंडरपास असावे, एकेरी मार्ग करावा, एसटीची वाहतूक अन्य मार्गाने वळवावी अशा सूचना करण्यात आल्या.

त्याअनुषंगाने महापालिकेच्या बांधकाम विभागाने वाहतूक कोंडीचा अभ्यास सुरू केला आहे. ओरिजिन ॲन्ड डेस्टिनेशन पद्धतीने वाहतुकीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २४ तास वाहतुकीचा ट्रॅफिक काउंट घेतला जाणार आहे. के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या विद्यार्थी सर्वेक्षण करणार होते.

त्यानुसार मार्च महिन्यात तारीखदेखील निश्चित करण्यात आली. परंतु अभियांत्रिकी परीक्षामुळे सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तीव्र उन्हामुळे विद्यार्थी मिळत नसल्याचे कारण के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाकडून देण्यात आले आहे.