Traffic Problem : महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच! लग्न तिथींमुळे स्थिती | Traffic jams on highway common Status due to marriage dates nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic Problem

Traffic Problem : महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच! लग्न तिथींमुळे स्थिती

Traffic Problem : शहराच्या अनेक भागातील चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. त्यावर विविध उपाययोजना सुचविण्यात येत असतानाच मुंबई आग्रा महामार्गासह छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीने स्थानिकांसह नियमित प्रवास करणाऱ्यांची डोकेदुखी मात्र वाढविली आहे.

आता लग्नसराईमुळे कोंडीत भरच पडत असल्याने वाहतूक पोलिसांसमोर वाहतूक कोंडी सोडविण्याचे आव्हान आहे. (Traffic jams on highway common Status due to marriage dates nashik news)

महामार्गावरील अमृतधाम, बळीमंदिर व जत्रा हॉटेल या तीन चौफुल्यांवरील नेहमीच्याच वाहतूक कोंडीमुळे न्हाईने के. के. वाघ अभियांत्रिकी ते जत्रा चौफुलीपर्यंत नव्याने उड्डाणपुलाची निर्मिती केल्यावर वाहतूक कोंडीवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती.

परंतु, पुलाच्या निर्मितीनंतर या तिन्ही चौफुल्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्याची चिन्हे नाहीत. त्यातच विकेंडला आलेल्या लग्न तिथीमुळे या कोंडीत मोठी भरच पडत आहे.

सायंकाळपर्यंत येथील विविध चौफुल्यांवर पोलिस कर्मचारी तैनात असतात तोवर परिस्थिती सुरळीत असते, परंतु, रात्री उशिरा वाहतूक शाखेचे कर्मचारी गेल्यावर या कोंडीत मोठी भर पडत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.

जत्रा चौफुलीवर रात्री उशीरापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होते, कोणीही माघार घेण्यास तयार नसल्यामुळे कोंडीत भरच पडत गेली. रविवारी (ता. २१) स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्यावर रात्री उशिरा सुरळीत वाहतूक सुरू झाली होती. विशेष म्हणजे केवळ जत्रा चौफुलीच नव्हे तर बळीमंदिर, अमृतधाम चौफुलीवरही हीच परिस्थिती होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छत्रपती संभाजीनगर रोडवरही वाहतूक कोंडी

नवीन आडगाव नाक्यापासून ते थेट नांदूर नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर लॉन्स आहेत. येथील बहुसंख्य लॉन्सने पार्किंग सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

परंतु लवकर निघण्यासाठी अनेकजण रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करत असल्याने तसेच दाट लग्नतिथीमुळे औरंगाबाद रोडवरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच येथील बहुसंख्य विवाह गोरज मुहूर्तावरच असल्याने वाहतुकीच्या कोंडीत भरच पडत आहे.

तपोवनातही तीच परिस्थिती

शनिवार-रविवारचा विकेंडचा फायदा घेत तपोवनातील स्वामी नारायण मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी उसळत आहे. तसेच, शाळांनाही सुट्ट्या दररोज याठिकाणी गर्दी होत आहे.

नदीकाठावरील रमणीय वातावरणातील या मंदिरामुळे याभागातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळालेली असली तरी, देवस्थानची पार्किंगची स्वतंत्र मोठी व्यवस्था नसल्याने अनेकजण शाही मार्गाच्या कडेलाच वाहने उभी करतात.

त्यातच केवडीबनातील प्राचीन व जागृत म्हसोबा मंदिरात दोन दिवस यात्रोत्सवामुळे मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे नवीन शाहीमार्गावरही मोठी वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळाली.