Traffic Survey Planning : मुंबई नाका चौकाचे शुक्रवारी ट्रॅफिक काऊंट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Naka

Traffic Survey Planning : मुंबई नाका चौकाचे शुक्रवारी ट्रॅफिक काऊंट!

नाशिक : समृद्धीसह प्रस्तावित ग्रीन फिल्ड महामार्गामुळे मुंबई, नागपूर व सुरत ही तीन महत्त्वाची मेट्रो शहरे नाशिकशी रस्ते मार्गाने, तर सेमी हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून पुणे शहराजवळ येणार आहे.

त्याचा परिणाम शहरातील प्रमुख तीन चौकावर होणार आहे. त्यातील नाशिक रोड विभागातील सिन्नर फाटा, द्वारका चौक, मुंबई नाका व पाथर्डी फाटा या भागात नागरिकांसह वाहनांची वर्दळ वाढणार आहे. मुंबई नाका येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शुक्रवारी (ता. ३) वाहतूक सर्वेक्षण केले जाणार आहे.

द्वारका चौकात डबलडेकर पुलामुळे वाहतुकीचे सर्वेक्षण होणार नाही तर सिन्नर फाटा व पाथर्डी फाटा येथे वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. (Traffic Survey Planning Traffic count of Mumbai Naka Chowk on Friday nashik news)

शहराचा विस्तार वाढत असताना वाहतुकीची समस्या जटिल बनली आहे. मुख्यत्वे चौकांमध्ये वाहतूक ठप्प होत असल्याने मुंबई, पुणे शहराप्रमाणे स्थिती होत आहे. द्वारका, मुंबई नाका, आडगाव नाका, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, शालिमार चौक, वडाळा नाका, लेखानगर चौक, एबीबी सर्कल, काठे गल्ली, फेम टॉकीज सिनेमा, उपनगर, दत्तमंदिर, बिटको, सिन्नर फाटा या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते.

औरंगाबाद महामार्गावरील ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यानंतर नियमित रस्ता सुरक्षा समितीची बैठक सुरू झाली. या बैठकीत तत्कालीन पोलिस आयुक्तांनी मुंबई नाका येथील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय सुचविले.

त्यात मुंबई नाका सर्कलची व्याप्ती कमी करावी, दोन अंडरपास तयार करावा, एकेरी मार्ग करावा, एसटीची वाहतूक वळवावी आदी सूचना करण्यात आल्या. त्याअनुषंगाने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून मुंबई नाका भागातील वाहतूक कोंडीचा अभ्यास सुरू करण्यात आला.

‘ओरीजीन अॅन्ड डेस्टीनेशन’ पद्धतीने वाहतूक सर्वेक्षणाचा अभ्यास करण्याबरोबरच २४ तासाचा ट्रॅफिक काऊंट घेतला जाणार आहे. वाहतूक सर्वेक्षणाचा अहवाल तयार करण्याचे काम के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी करणार आहेत.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

द्वारका चौकासाठी स्वतंत्र नियोजन

मुंबई- आग्रा महामार्गावरील द्वारका चौकातदेखील वाहतूक कोंडी होते. परंतु येथून भारतमाला प्रकल्पांतर्गत डबलडेकर उड्डाणपूल तसेच येथेच मेट्रोचे जंक्शन राहणार असल्याने वाहतुकीचे मुख्य केंद्र होणार आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतुकीचे स्वतंत्र नियोजन केले जाणार आहे.

मेट्रो, रेल्वे व सिटीलिंक बससेवेसाठी मेट्रो हब तयार केले जाणार असल्याने भविष्यात येथेदेखील वाहतूक कोंडी होणार असल्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्याने नियोजन केले जाणार आहे. पाथर्डी फाटा भागातदेखील वाहतुकीसाठी नवीन नियोजन केले जाणार आहे.

"मुंबई नाका भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ट्रॅफिक काऊंट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतुकीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून रस्ता सुरक्षा समितीला सादर होईल. त्यानंतर उपाययोजना केल्या जातील."- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.