Nashik Accident: सटाणा-देवळा रस्त्यावर तिहेरी अपघात; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू, बस व ट्रॅक्टरमधील प्रवासी गंभीर | Triple accident on Satana Devla road Tractor driver died passenger in bus and tractor critical Nashik Accident news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Nashik Accident: सटाणा-देवळा रस्त्यावर तिहेरी अपघात; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू, बस व ट्रॅक्टरमधील प्रवासी गंभीर

Nashik Accident : शहरातून जाणाऱ्या साक्री - शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा - देवळा रस्त्यावर सावकी फाट्यावर आज बुधवार (ता.१०) रोजी रात्री ९.३० वाजता बस, पीकअप आणि ट्रॅक्टरच्या भीषण तिहेरी अपघातात ट्रॅक्टरचालकाचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील प्रवाशांसह ट्रॅक्टरवरील दहाहुन अधिक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. (Triple accident on Satana Devla road Tractor driver died passenger in bus and tractor critical Nashik Accident news)

याबाबत प्रत्यक्षदर्शी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकहुन नंदुरबारकडे जात असलेल्या एसटी बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या जबर धडकेत ट्रॅक्टर चालक रस्त्यावर जोरात फेकला गेला.

भरधाव वेगात असलेली नाशिक - नंदुरबार बस आणि ट्रॅक्टर यांच्यात मोठी टक्कर झाल्याने ट्रॅक्टरच्या पुढे चालत असलेल्या पिकअपला ट्रॅक्टर जोरात धडकला.

या तिहेरी भीषण अपघातात भऊर (ता.देवळा) येथील ट्रॅक्टरचालकाचा (नाव समजू शकले नाही) जागीच मृत्यू झाला, तर नाशिक- नंदुरबार बसमधील प्रवाशांसह ट्रॅक्टरवरील प्रवाशी गंभीर जखमी आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व जखमी प्रवाशांना तात्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिहेरी अपघातामुळे सटाणा - देवळा महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती.

दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच सटाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.