Nashik News : शहरात ‘ट्रिपल सीट’ ची Ride जोरात; दुर्लक्षामुळे सर्वच एकेरी मार्ग बनले दुहेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

people tripple seat ride in front of police

Nashik News : शहरात ‘ट्रिपल सीट’ ची Ride जोरात; दुर्लक्षामुळे सर्वच एकेरी मार्ग बनले दुहेरी

नाशिक : आयुक्तांच्या आदेशाने एकीकडे हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पोलिसांकडून दंडवसुली सुरू असताना दुसरीकडे शहरातील अनेक चौकात थेट पोलिसांसमोरच ट्रिपल सीट (Triple Seat) राइडची धूम सुरूच आहे. (triple seat ride continues in many squares of city right in front of police nashik news)

त्यातच शालिमार चौक, रविवार कारंजा, टिळक पथ सिग्नलवर अनेक दुचाकींसह चारचाकी वाहनेही थेट एकेरी मार्गाच्या रस्त्याने येत असल्याने एकेरी मार्गही दुहेरी बनले आहेत.

तत्कालीन पोलिस आयुक्त पांडे यांच्या आदेशाने शहरात पुन्हा हेल्मेटसक्ती झाली. श्री. पांडे यांची बदली झाल्यावरही नूतन आयुक्तांनी हेल्मेटसक्ती कायम ठेवण्यास पसंती दिली. त्यामुळे विनाहेल्मेट दंडात्मक कारवाई सुरूच आहे.

दुसरीकडे शहरातील अनेक मुख्य चौकासह थेट महामार्गावरही सर्रास ट्रिपल सीट चालविणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यातील निर्ढावलेले काहीजण थेट शहरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून गर्दीतून ट्रिपल सीट दुचाकी चालवत असल्याने शहरात कायद्याचे राज्य आहे की कसे असा प्रश्‍न पडतो.

ना हेल्मेट... ना संयम...

शहरातील गर्दीच्या ठिकाणांसह थेट महामार्गावरही ट्रिपल सीटची रपेट वाढली आहे. विशेष म्हणजे या बाईकस्वारांकडे ना हेल्मेट ना संयम. गर्दीच्या सिग्नलवरही ट्रिपल सीट राइडर भरधाव वेगाने वाहने चालवितात. शहरातील अनेक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचे सांगितले जाते, मग यातून ट्रिपल सीटला परवानगी आहे की काय असा प्रश्‍न पडतो.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

याबाबत एखाद्याने हटकले तर अरेरावीची भाषा केली जाते. एखाद्या ठिकाणी पकडले गेलेच तरी संबंधित भाईदादांचे नाव घेऊन व तेही न जमल्यास चिरीमिरी देऊन सुटका करून घेतात. त्यामुळे कायद्याचे पालन करून गाडी चालविणाऱ्यांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एकेरी मार्गावर दुचाकींसह रिक्षांची गर्दी

शहरात पाच ते सात ठिकाणी एकेरी वाहतुकीचे फलक लावण्यात आले आहे, परंतु सर्वाधिक वर्दळीच्या टिळक पथ सिग्नलसह रविवार कारंजाकडून अशोक स्तंभ या एकेरी मार्गावरही दुचाकींसह रिक्षाही थेट दिसू लागल्याचे दिसून येते.

पंचवटीतील मालेगाव स्टॅन्डकडून रामतीर्थाकडे जाता येते, परंतु या एकेरी मार्गावरूनही बिनदिक्कत वाहने दोन्ही बाजूने सुरू आहे, याभागात आधीच तीव्र उतार असल्याने अपघाताची शक्यता आहे, परंतु समोर पोलिस चौकी असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.