लग्नसराईतही नाशिकमधील फुलबाजार कोमेजलेलाच

 flower market
flower market Google

पंचवटी (नाशिक) : जूनसह जुलै महिन्यात काही विवाह तिथी शिल्लक आहेत. मात्र, कोरोना (Coronavirus) उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर विवाहांसह अन्य समारंभांवर लादलेले संख्यात्मक बंधन, त्यातच गेल्या वर्षीपासून सुरू झालेली ‘देऊळबंदी’ यामुळे गणेशवाडीतील फुलबाजार (Flower Market) काही प्रमाणात निर्बंध हटविल्यानंतरही कोमेजलेलाच आहे. (turnover in the flower market has slowed down in nashik city)


पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर सराफ बाजारातील फुलबाजार गणेशवाडीत स्थलांतरीत होऊन दोन वर्षे उलटली. सुरवातीच्या काळात या बाजारात लाखो रूपयांची उलाढाल होऊ लागल्याने तो चांगलाच बहरला. त्यामुळे हा बाजार थेट गाडगे महाराज पुलाच्या पलीकडे सरकला. या बाजारात जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातील फुलविक्रेते येऊ लागल्याने शेतकरी, व्यापारी, किरकोळ विक्रेते यांच्या अर्थकारणासही मोठी बळकटी मिळाली. मात्र, त्यानंतरच्या दीर्घ लॉकडाऊनमुळे विवाह समारंभासह अन्य कार्यक्रमातील उपस्थितीवर अंकुश आला. शिवाय शहरातील मंदिरेही बंद असल्याने फुलविक्री वीस-तीस टक्क्यांवर आल्याचे विक्रेते सांगतात.


या फुल बाजारात भल्या पहाटे फुल उत्पादक शेतकरी दाखल होतात. यात नाशिक परिसरातील शेतकयऱ्यांसह अन्य जिल्ह्यातील फुल उत्पादकही मोठ्या संख्येने येतात. बाजारात झेंडू, मोगरा, शेवंती, गुलाब, निशिगंध, जरबेरा, गेलडा आदी फुलांची मोठी आवक होते. याशिवाय बुके बनविण्यासाठी ग्लाडिओ, ऑर्केट, जरबेरा, लांबी दांडीचे गुलाबाचीही मोठी आवक होते. वीस तीस वर्षापूर्वी हिरावाडी, तपोवन भागात मोठ्या प्रमाणावर फुलशेती केली जात असे. आता या फुलशेतीच्या जागी टुमदार बंगले, अपार्टंमेंटस उभ्या राहिल्याने त्यावर गंडांतर आले. सध्या मोहाडी, जानोरी, ओझर, मखमलाबादसह थेट शेजारच्या जिल्ह्यातूनही फुलांची आवक होते.


नाशिकचा गुलाब जातोय परदेशात

नाशिकच्या लांब दांडीच्या व दर्जेदार गुलाबाला परदेशात मोठी मागणी आहे. येथून दुबई, अबुधाबीसह युरोपच्या काही भागातही गुलाबाची निर्यात होते. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या ही निर्यात घटलेली असलीतरी भविष्यात नाशिकच्या गुलाबाला पुन्हा परदेशातील मागणी वाढण्याची आशा या गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांना आहे.

 flower market
नाशिक ऑक्सिजन दुर्घटना पावसाळी अधिवेशनात गाजणार


विशेष मागणी नाही

सार्वजनिक समारंभाच्या उपस्थितीवर मध्यंतरी अंकुश लावण्यात आला होता. लग्न समारंभात मोठ्या प्रमामावर गुलाबाला मागणी होती. याशिवाय बायकांमध्ये गजरे प्रिय असल्याने मोगऱ्ंयाच्या गजऱ्यांनाही उठाव होता. अजूनही लग्न समारंभातील उपस्थितीवर अंकुश असल्याने गुलाब, मोगरा यांना विशेष मागणी नाही. याशिवाय इतर सार्वजनिक समारंभही बंद असल्याने बुकेसाठी लागणाऱ्या लिली, जरबेरा, ग्लाडिए, ऑरर्केट, निशिगंधा, लांब दांडीचे गुलाब यांना मागणी नसल्याचे विक्रेते सांगतात.

फुलांचे भाव-

गुलाब- २० ते २५ रूपये (बारा फुलांची जुडी), झेंडू दीडशे ते दोनशे रूपये कॅरेट, मोगरा १२० रूपये किलो, गुलछडी १२० रूपये किलो, बिजली १२० रूपये, जिप्सी ५० रूपये जुडी, शेवंती ८० ते १०० रूपये किलो, पर्पल ६० रूपये किलो.

 flower market
देशातील अत्याधुनिक नवशहर सिडको उभारणार पांजरपोळ जागेत


सध्या लग्नसराई सुरू असली तरी उपस्थितीवरील मर्यादा, मर्यादित तिथीमुळे फुलांना विशेष मागणी नाही. भविष्यात मंदिरे खुली होण्याबरोबर विवाहांच्या उपस्थितीवरील मर्यादा हटविल्यावर मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
- संदीपआप्पा शिंदे, अध्यक्ष जिल्हा फुल मार्केट (किरकोळ व घाऊक)

मंदिरांबरोबरच मोठ्या विवाह समारंभावर बंदी आहे. त्यामुळे फुलांना विशेष मागणी नाही. महिलांमध्ये मोठी क्रेझ असलेल्या गजऱ्यांनाही मागणी नसल्याने विक्रेत्यांचे अर्थकारण बिघडले आहे.
- विशाल तांदळे, विक्रेता

लग्न समारंभासह वाढदिवस, छोट्या मोठ्या कार्यक्रमांतील उपस्थितीवर बंधने आहेत. त्यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत मोठी घट झालेली आहे.
- प्रदीप चव्हाण, विक्रेता

(turnover in the flower market has slowed down in nashik city)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com