Nashik Accident News : भरधाव Car पलटी होऊन दोघांचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच | Two killed in high speed car overturn series of accidents continues on Samruddhi Highway Nashik Accident News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Nashik Accident News : भरधाव Car पलटी होऊन दोघांचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

Nashik Accident News : हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू होऊन आठवडा उलटत नाही तोच या महामार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात घडू लागले आहेत.

शनिवारी मध्यरात्री सिन्नर तालुक्यातील सायाळे गावाजवळ शिर्डीच्या दिशेने जाणारी ब्रिजा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कारमधील तिघे मृत्युमुखी पडले. तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील मृत व जखमी एकाच कुटुंबातील आहेत.

समृद्धी महामार्गावर सायाळे शिवारात शनिवारी मध्यरात्री शिर्डीच्या दिशेने जाणारी ब्रिजा कार क्रमांक एम. एच. 20 / ई. वाय. 5257 टायर फुटल्याने अपघातग्रस्त झाली. शिर्डीच्या दिशेने जाणारी मार्गिका ओलांडून तीन ते चार पलटी घेत कार थेट मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या विरुद्ध मार्गिकेवर जाऊन पडली.

या अपघातात धरमसिंग काळूसिंग परदेशी (51), राघवेंद्र भरतसिंग परदेशी (11), राजेंद्र नरसिंगराव राजपूत (49) या तिघांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर कार चालक भरतसिंग काळूसिंग परदेशी (43), नंदीनी भरतसिंग परदेशी (40), शिवम भरतसिंग परदेशी(16) हे तिघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती समजल्यावर शिर्डी व गोंदे येथील इंटरचेंज वरील मदत पथके, वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी, महामार्ग सुरक्षा पोलीस पथकातील कर्मचारी अपघात स्थळी धावून आले. रुग्णवाहिकेतून मृतदेह व जखमींना सिन्नर येथील रुग्णालयात नेण्यात आले.

अपघातातील मृत व जखमी एकाच कुटुंबातील आहेत. परदेशी कुटुंबीय जालना जिल्ह्यातील राजेवाडी ता. बदलापूर येथील रहिवासी असून मयत राजपूत हे संभाजीनगर जिल्ह्यातील बोधेगाव ता. फुलंब्री येथील रहिवासी आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय सोनवणे, हवालदार नितीन जगताप तपास करीत आहेत.

समृद्धी महामार्गावर अनियंत्रित वेगामुळे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी देखील वावीजवळ दोन वाहने अपघातग्रस्त झाली होती. समृद्धीवर वेग मर्यादा पाळली जात नसल्याने अपघात होत आहेत.

शिवाय वाहनाच्या टायरची स्थिती, नायट्रोजन हवा याबाबत तपासणी केली जात नाही. याशिवाय सरळ रेषेत सलग वाहन चालवल्याने वाहन चालक संमोहित होत असल्याचा प्रकार देखील वाढत्या अपघातांना कारणीभूत आहे.

अपघाताबाबत समृद्धी महामार्गाच्या संभाजीनगर येथील हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधला असता कोणतीही माहिती मिळाली नाही.

संबंधित हेल्पलाइनवर असणाऱ्या अधिकाऱ्याकडून अपघात किंवा इतर बाबींची माहिती हवी असल्यास एमएसआरडीसीच्या बांद्रे येथील मुख्य कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षाशी बोला असे सांगितले. मात्र तेथील जबाबदार व्यक्तीचा संपर्क क्रमांक द्यायला नकार देण्यात आला.

स्थानिक पोलिसांची होतेय दमछाक...

समृद्धी महामार्गाचा टप्पा क्रमांक 12 मधील सुमारे 40 किलोमीटर अंतराचा भाग वावी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या महामार्गावर अपघात झाल्यास थेट गोंदे येथील इंटरचेंजवरून पोलिसांना अपघात स्थळी पोहोचावे लागते.

वावी ते गोंदे हे अंतर सुमारे 20 किमी आहे. अपघात शेवटच्या टोकाला पाथरेला असो की गोंदे शिवारात. पोलिसांना गोंदे येथूनच महामार्गावर प्रवेश करून उलट प्रवास करावा लागतो.

पोलिसांची होणारी दमछाक टाळण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने वावी परिसरात आपत्कालीन मार्ग पोलीस व रुग्णवाहिकांसाठी बनवून दिल्यास रुग्णांचे प्राणही वाचतील आणि अपघात स्थळी पोलिसांची मदत देखील वेळेवर पोहोचणार आहे.