esakal | भरधाव टँकरची टेम्पोला धडक; कुटूंबातील कर्ते तरूण काळाआड
sakal

बोलून बातमी शोधा

accident

भरधाव टँकरची टेम्पोला धडक; कुटूंबातील कर्ते तरूण काळाआड

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : इंधन संपल्याने बंद पडलेला टेम्पो (एमएच ४३ एच ३७४६) रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी चालकासह टेम्पोतील प्रवासी ढकलत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने (एमएच १८ बीडी ८३९२) टेम्पोला धडक दिल्याने चालकासह दोघे जण जागीच ठार झाले. दोघे गंभीर जखमी झाले असून चौघे किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाके फाट्याजवळ मंगळवारी (ता.२०) सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये चालक इश्‍तियाक अहमद मोहमद इलियास (वय ३०, रा. सर्वे न. २१२) व अय्युब खान युनूस खान (२७, रा. वरळी राेड, मालेगाव) यांचा समावेश आहे. (Two-killed-Tempo-tanker-accident-at-highway-marathi-news-jpd93)

कुटूंबातील कर्ते तरूण काळाआड

शहरातील भंगार बाजारातील मोबाईल विक्रेते मुंबई येथून जुने माेबाईल खरेदी करुन शहरात विक्री करतात. येथील आठ ते दहा मोबाईल विक्री करणारे व्यापारी टेम्पो ट्रॅव्हलरने मुंबई येथून परतत असताना वाके शिवारात डिझेल संपल्याने टेम्पो बंद पडला. चालकाने पंप मारुन टेम्पो चालू होतो की काय याची चाचपणी केली. टेम्पो चालू न झाल्याने रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी चालकाने दुसऱ्याला चालविण्यासाठी बसवून चालक इश्‍तियाकसह प्रवासी टेम्पो पाठीमागून ढकलत असतानाच भरधाव टँकरने यांच्यावर काळाचा घाला घातला. यात कुटुंबातील दोघा कर्त्या तरुणांना प्राण गमवावे लागले. जखमी मुश्‍ताक अहमद यांच्या तक्रारीवरुन फरार टँकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार

अपघाताचे वृत्त समजताच साहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पाटील, पोलिस नाईक सचिन गायकवाड, पोलिस शिपाई के. जे. थोरात तातडीने घटनास्थळी रवाना झाले. स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. खुर्शीद अहमद (३५), मुश्‍ताक अहमद मोहंमद अय्युब (४०, दोघे रा. हिरापुरा) हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य चौघे किरकोळ जखमी झाले.

हेही वाचा: कुल्फी विकणारा बनला पैठणी उद्योजक! जामदारीची पैठणी चेन्नईला

हेही वाचा: डाळींचे चढे भाव कोरोनाकाळात टिकून! व्यापाऱ्यांची नाराजी

loading image