
Nashik Crime: कुख्यात डेव्हिड टोळीच्या दोघा म्होरक्यांना अटक; इगतपुरी पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात
Nashik Crime : इगतपुरीतील दोन खुनप्रकरणात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात डेव्हिड टोळीच्या दोघा म्होरक्यांच्या मुसक्या आवळण्यात इगतपुरी पोलिसांना यश आले.
गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोघा संशयितांचा ग्रामीण पोलीस राज्य-परराज्यात शोध घेत असताना ते मुंबईतील विक्रोळीत असताना सापळा रचून शिताफींनी अटक केली.
दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी सदरची कामगिरी करणार्या इगतपुरी पोलिसांना रिवॉर्ड जाहीर केला आहे. (Two leaders of notorious David gang arrested Igatpuri Police took custody from Mumbai Nashik Crime news)
जॉन पेट्रिक मॅनवेल उर्फ छोटा पापा (२२), अजय पॅट्रिक मॅनवेल उर्फ आज्या (२७, दोघे रा. गायकवाड नगर, इगतपुरी, जि. नाशिक. हल्ली रा. हरियाली व्हिलेज, गणेश चाळ, विक्रोळी पूर्व, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या डेव्हिड गँगच्या म्होरक्यांची नावे आहेत.
संजय बबन धामणे (रा. सुमंगल रेसीडेन्सी, डाक बंगला, इगतपुरी) यांचा डिसेंबर २०२० मध्ये तीक्ष्ण हत्यारांनी हत्त्या करण्यात आली होती. तर, ऑगस्ट २०२२ मध्ये झाकीया मेहमुद शेख (रा. गायकवाड नगर, इगतपुरी) या महिलेचाही डेव्हिड गँगने चाकूने वार करून निर्घृण खून केला होता.
याप्रकरणी टोळीच्या म्होरक्यांविरोधात खुनाच्या गुन्हयांसह प्राणघातक हल्ला, दरोडा, जबरी लुटमार, चोरी, गंभीर दुखापतींसह हत्यार बाळगल्याप्रकरणी विविध गुन्हे इगतपुरी पोलीस, इगतपुरी रेल्वे, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
परंतु संशयित गेल्या तीन वर्षांपासून फरार होते. त्यांच्या शोधासाठी इगतपुरी व ग्रामीण पोलिस राज्यासह परराज्यात शोध घेत होते. अखेर दोघांना इगतपुरी पोलिसांनी मुंबईतील विक्रोळीतून सापळा रचून अटक केली आहे.
न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, इगतपुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे हे करीत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दोघांचे विक्रोळीत वास्तव्य
खुनासह विविध गुन्ह्यात फरार असलेल्या डेव्हिड गँगच्या या म्होरक्यांना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी इगतपुरी पोलीसांना सूचना केल्या होत्या. कर्नाटकसह मुंबई, पुणे, संभाजीनगर याठिकाणी दोघेही संशयित अस्तित्व लपवून वास्तव्य करीत होते.
दोन महिन्यांपासून शोध सुरू असताना इगतपुरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना दोघे संशयित विक्रोळीत वास्तव्याला असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने गेल्या चार दिवसांपासून दोघा संशयितांवर पाळत ठेवून होते.
संधी मिळताच पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकून जॉन व अजय या दोघा कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्या.
अधीक्षकांकडून रिवॉर्ड
डेव्हिड गँगच्या कुख्यात गुंडांना जेरबंद करण्यासाठी इगतपुरीचे वरिष्ठ निरीक्षक राजु सुर्वे, सहायक निरीक्षक विकास ढोकरे, हवालदार दीपक आहिरे, किशोर खराटे, गोरक्षनात संवत्सरकर, गिरीश बागुल, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सचिन देसले, मुकेश महिरे, अभिजित पोटिंदे या पथकाने अटक केली.
अधीक्षकांनी या पथकाला २० हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर करीत अभिनंदन केले आहे.
असे आहेत गुन्हे दाखल
* जॉन उर्फ छोटा पापा याच्याविरोधात खुनासह प्राणघातक हल्ल्याचे दोन, दरोड्याचा एक, गंभीर मारहाण, हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.
* अजय उर्फ आज्या याच्याविरोधात खुनाचे दोन, प्राणघातक हल्ल्याचे दोन तर जबर हल्ल्या असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.