Sahyadri Farms Ultra Marathon : ‘सह्याद्री'तर्फे मोहाडीमध्ये रविवारी अल्ट्रा मॅरॅथॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sahyadri Ultra Marathon

Sahyadri Farms Ultra Marathon : ‘सह्याद्री'तर्फे मोहाडीमध्ये रविवारी अल्ट्रा मॅरॅथॉन

नाशिक : सह्याद्री फार्म्सतर्फे विनियार्ड अल्ट्रा मॅरॅथॉनचा शुभारंभ रविवारी (ता. २६) सकाळी सहाला मोहाडीच्या (ता. दिंडोरी) सह्याद्री फार्म्स येथून होईल. सह्याद्री रन ही अल्ट्रा मॅरॅथॉन राज्यात प्रथम मोठ्याप्रमाणावर होत आहे.

पाच किलोमीटर पासून ते ३३८ किलोमीटरपर्यंतचे वेगवेगळे टप्पे निश्‍चित करण्यात आले आहेत. (Ultra Marathon on Sunday in Mohadi by Sahyadri farms nashik news)

सह्याद्री फार्म्स आणि ब्ल्यू ब्रिगेड यांच्यातर्फे होणाऱ्या मॅरॅथॉनमध्ये २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत अल्ट्रा रनर्स ५०, १०० ते ३३८ किलोमीटर पर्यंतचे अंतर वेगवेगळ्या टप्प्यात पार करतील. नियमित स्वरुपाची मॅरॅथॉन ही रविवारी (ता. २६) सकाळी सहाला सुरु होईल.

त्यामध्ये ५, १०, २१ आणि ४२ किलोमीटर हे महत्वाचे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यात स्पर्धकांना बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. त्यात स्पर्धकांना एक टी-शर्ट, डिकॅथलॉनची बॅग, फळांचे रस, प्रमाणपत्र आणि पदक मिळेल.

‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांच्या पुढाकारातून त्यांच्याच शिवारातून होत असलेली मॅरॅथॉन हे या मॅरॅथॉनचे वैशिष्ट्य आहे. विनियार्ड अल्ट्रा ही विशेष संकल्पना या मॅरॅथॉनच्या आयोजनात आहे. ही मॅरॅथॉन प्रथमच शेतशिवारातून होणार आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

द्राक्षपिकांच्या बांधाबांधाने, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, पालखेड धरणाच्या जवळून धावणे होणार आहे. इच्छुकांना संकेत झांबरे यांच्याशी ७०३०९६२८७१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. अथवा सह्याद्री फार्म्सच्या संकेत स्थळावर नोंदणी करता येईल.

"सशक्त शरीरात सशक्त मन असते. या म्हणी प्रमाणे आपल्या प्रत्येकाने शारिरीक आरोग्याचीही योग्य पध्दतीने काळजी घेतली पाहिजे. ही मुख्य भूमिका या उपक्रमामागे आहे. त्याचा अधिक नागरिकांनी लाभ घ्यावा."-विलास शिंदे (अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी)