
Asaduddin Owaisi : पंतप्रधानांनी चित्रपटाचा प्रचार करणे दुर्दैवी; असदुद्दीन ओवैसी यांची टीका
Asaduddin Owaisi : ‘द केरला स्टोरी‘ हा अत्यंत वाह्यात पद्धतीचा चित्रपट बनविला असून देशाचे पंतप्रधान या चित्रपटाचा प्रचार करत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी खरमरीत टीका एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धुळ्यात आज केली.
एमआयएमचे धुळे शहराचे आमदार फारुक शाह यांनी आयोजित केलेल्या मुस्लिम समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्ताने ते सोमवारी (ता. ८) सायंकाळी धुळ्यात आले होते. या प्रसंगी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. (Unfortunate for PM to promote film the kerala story Criticism of Asaduddin Owaisi nashik news)
‘द केरला स्टोरी‘ या चित्रपटाबाबत खासदार ओवैसी म्हणाले, की केरळची सत्य परिस्थिती अत्यंत वेगळी असून चित्रपटात दाखवलेली परिस्थिती चुकीची आहे. या पद्धतीने अत्यंत वाह्यात पद्धतीचा चित्रपट बनवला असून देशाचे पंतप्रधान त्याचा प्रसार करत आहेत,
ही दुर्दैवी बाब आहे. खासदार शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मुद्दा असून आपण त्यावर काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांना विचारावे
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ होत आहे, याबाबत खासदार ओवैसी यांना विचारले असता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांना याबाबत विचारणा करायला हवी, उपमुख्यमंत्री फडणवीस हे लव्ह जिहाद याबाबत बोलतात.
मात्र, बेपत्ता महिला संदर्भात बोलत नाहीत, अशी टीका खासदार ओवैसी यांनी केली. मोदी फक्त टीका करतात काम मात्र करत नाहीत, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.
पावसाळ्यापूर्वी सभा घ्या
आपण सामुदायिक लग्न सोहळ्यात आलो असल्याने या सोहळ्यात राजकीय पार्टींचे लग्न लावणार नाही, अशी मिस्कील टिप्पणी करत राजकीय अंगाने बोलण्यासाठी पावसाळ्यापूर्वी एखादी सभा आयोजित करा, असे आवाहन खासदार ओवैसी यांनी आमदार श्री. शाह यांना उद्देशून केले.
दरम्यान, लग्नानंतर घरदार, परिवार सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
सामुदायिक विवाह सोहळा
सोमवारी रात्री नऊनंतर शहरातील ऐंशी फुटी रोड भागातील तिरंगा चौकाजवळ सामुदायिक विवाह सोहळा झाला. आमदार शाह, वाल्मीक दामोदर, शशिकांत वाघ, गुफरान पोपटवाले, शव्वाल अन्सारी, भोला शहा यांच्यासह इतर मान्यवर,
पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यात खासदार ओवैसी म्हणाले, की सामुदायिक विवाह सोहळ्यात २४ मुला-मुलींचे लग्न लावून आमदार शाह यांनी चांगले काम केले आहे. वधू-वरांना शुभेच्छापर संदेश देताना त्यांनी वधू-वरांच्या कुटुंबासह समाजाला आवाहन केले, की जी मुलगी आपले घरदार, परिवार सोडून सासरी येणार आहे,
त्या मुलीची सासरच्या मंडळीने काळजी घ्यावी, सासरी येणाऱ्या मुलीनेही सासरच्या मंडळींची काळजी घ्यावी. खासदार ओवैसी यांच्याहस्ते कब्रस्तानसह तीन ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.