‘वर्किंग क्लास’चा हॉटेल- रेस्टॉरंटला काहीसा ‘बूस्ट'

hotel industry
hotel industryesakal

नाशिक : तीर्थनगरी नाशिकमध्ये व्यापार-उद्योगांसह सरकारी कामांनिमित्त येणाऱ्या ‘वर्किंग क्लास’ची (working class) पावले लॉकडाउनमधील कडक निर्बंध शिथिल केल्यानंतर नाशिककडे वळू लागली आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या हॉटेल- रेस्टॉरंट इंडस्ट्रीजला काहीसा ‘बूस्ट’ मिळू लागला आहे. पण हॉटेल-रेस्टॉरंट इंडस्ट्रीज अद्याप रुळावर येऊ शकलेली नाही. त्यासाठी महिनाभराचा कालावधी अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानुसार राज्य सरकारकडून व्यावसायिकांना सवलतींची प्रतीक्षा कायम आहे. (Unlock-Nashik-boost-hotel-Restaurant-industry)

व्यावसायिकांना राज्य सरकारकडून सवलतींची प्रतीक्षा

कोरोना संसर्गाचा दर अजूनही पाच टक्क्यांच्या आत आलेला नाही. नाशिक शहरातील बाधितांची संख्या कमी असली, तरीही ग्रामीण भागात बाधितांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचा वावर वाढल्यास संसर्ग बळावण्याची भीती प्रशासनामध्ये कायम आहे. त्यामुळे पूर्ण अनलॉकसाठी व्यावसायिकांना आठवड्याची वाट पाहावी लागणार, हे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आढावा बैठकीनंतर स्पष्ट झाले. मात्र, हॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांना हे मान्य नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्या धोरणाचा विचार नाशिकबद्दल व्हायला हवा, अशी व्यावसायिकांची अपेक्षा आहे. व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे याबबात पालकमंत्र्यांना पत्र दिले आहे.

तीर्थटनासाठी नाशिकमध्ये रविवारी ‘वीकेंड’ला रेलचेल

‘वर्किंग क्लास’मुळे लॉजिंगमधील काही हॉटेलमधील खोल्या ‘बुकिंग’ ५० टक्क्यांपर्यंत पोचले. काही लॉजिंगमध्ये हे प्रमाण दहा टक्क्यांच्या आत असल्याचे व्यावसायिकांशी झालेल्या संवादातून पुढे आले. तीर्थटनासाठी नाशिकमध्ये रविवारी (ता. १३) ‘वीकेंड’ला रेलचेल दिसली. मात्र, बहुतांश भाविकांनी नाशिकमध्ये मुक्काम करण्याऐवजी परतणे पसंत केले. स्वाभाविकपणे सोमवारी (ता. १४) कामकाजाला सुरवात झाल्यावर नाशिकमध्ये मुक्कामी राहण्याचे प्रमाण काय राहील, हे स्पष्ट होईल, असे व्यावसायिक सांगताहेत. हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये मुक्कामाची व्यवस्था असलेल्यांना भोजनाची सोय करण्यास सवलत दिली आहे. पण ज्याठिकाणी लॉजिंगमध्ये दहा टक्क्यांच्या आत प्रवासी असल्यावर ३० हजारांचा ‘कूक’ ठेवणे कसे परवडणार, असा प्रश्‍न उपस्थित करत व्यावसायिक ग्राहकांना ‘ऑनलाइन जेवण मागवा’, असा सल्ला देतात. सद्यःस्थितीत ५० टक्के एकावेळी ग्राहकांच्या उपस्थितीवर हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये बसण्याची परवानगी असली, तरीही ते दुपारी चारपर्यंत आहे. दुपारी चार ते रात्री आठपर्यंत ऑनलाइन पार्सलला परवानगी आहे. ‘वीकेंड’ला सकाळी सात ते रात्री आठपर्यंत ऑनलाइन खाद्यपदार्थांचे पार्सल मागविण्याची मुभा आहे.

सोशल मीडियातून जाहिराती

हॉटेल- रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थांची नेमकी किती सोय होऊ शकली आहे, याची माहिती घेतल्यावर हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोचल्याचे आढळले. पार्सलसाठी कामगारांच्या कोरोना चाचण्या करून व्यावसायिकांनी पास काढले आहेत. त्याचवेळी पार्सल सोयीच्या सोशल मीडियातून व्यावसायिकांनी जाहिराती केल्या. तरीही बाहेरच्या राज्यातील कामगारांच्या आधारकार्डची अडचण असताना, कोरोनाची चाचणी करून घेण्यासाठी परराज्यातील कामगार फारसे तयार होत नाहीत. त्यातच, भाड्याच्या जागेतील व्यवसाय कसा परवडणार, म्हणून भाड्याच्या जागेतील हॉटेल- रेस्टॉरंट अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याचे व्यावसायिक सांगतात.

hotel industry
चंद्रकांत पाटलांचं मन लहान मुलासारखं; संजय राऊतांचा चिमटा

लाखभर जणांना रोजगार

नाशिक शहरात साडेतीनशेच्या आसपास हॉटेल-रेस्टॉरंट-लॉज, तर जिल्ह्यात एक हजाराहून अधिक आहेत. चहा-नाश्‍ता-भोजनाची सोय असलेले रेस्टॉरंट शहरात चार हजारांपर्यंत आणि जिल्ह्यात दहा हजारांपर्यंत आहेत. या इंडस्ट्रीमधून लाखभर जणांना रोजगार मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाउन जाहीर होण्याची चिन्हे दिसत असताना शहरातील बऱ्याच व्यावसायिकांनी आपल्या कामगारांना त्यांच्या घरी पाठवले असून, स्थानिक कामगारांच्या आधारे व्यवसाय सुरू ठेवला आहे.

हॉटेल-रेस्टॉरंट सकाळी सात ते रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळायला हवी. कोरोना संसर्ग पूर्ण नियंत्रणात आल्यावर पूर्वीप्रमाणे हीच वेळ रात्री उशिरापर्यंत केली जावी. शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रानुसार वीज, मालमत्ता करात सवलत द्यावी. त्याचवेळी ग्राहकांकडून व्हॅट वसूल करण्याऐवजी उत्पादक कंपन्यांना लागू करण्याची आवश्‍यकता आहे. -संजय चव्हाण, अध्यक्ष, नाशिक जिल्हा हॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिक संघटना

वीकेंडला गर्दीपासून दूर राहायचे म्हणून ‘वर्किंग क्लास’ मुक्कामी थांबलेला नाही. त्यामुळे आज लॉजिंगसाठी फारसे ग्राहक नव्हते. मुळातच, हॉटेल-रेस्टॉरंट-लॉज चालकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काळजी घेतली जात असून, ग्राहकसुद्धा त्यादृष्टीने काळजी घेतात. त्यामुळे हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालवण्याचा विचार व्हायला हवा. तसेच वीकेंडला लग्नासाठी परवानगी दिली म्हटल्यावर गोरज मुहूर्तावरही परवानगी मिळणे गरजेचे आहे. -शैलेश कुटे, हॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com