
Unseasonal Rain Damage : जिल्ह्यात 5 हजारांहून अधिक हेक्टरची दाणादाण
नाशिक : मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) जोरदार हजेरी, गारपीट यामध्ये गेल्या दोन दिवसांपर्यंत जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचे २ हजार ८३८ हेक्टरचे नुकसान झाले होते. (unseasonal rain and hailstorm More than 5 thousand hectares of agricultural area has been damaged nashik news)
येवला, निफाड, देवळा तालुक्यातील शनिवारच्या (ता. १८) नुकसानीचा कृषी विभागाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अंदाजानुसार एकूण ५ हजार १०४ हेक्टरहून अधिक क्षेत्राची दाणादाण उडाली आहे. शिवाय सिन्नर, इगतपुरी, चांदवड, नाशिक, दिंडोरी तालुक्यातील पुढील नुकसानीच्या प्राथमिक अहवालाची कृषी विभागाला प्रतीक्षा कायम आहे.
बागलाण तालुक्यात १७ ते १९ मार्च या कालावधीत एकूण ११ गावातील १३३ शेतकऱ्यांचे ६४.४० हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यात ११ गावांमधील ५७ शेतकऱ्यांच्या ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीचे प्रमाण २८, तर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीत ११ गावांमधील ७६ शेतकऱ्यांच्या ३६.४ हेक्टरचा समावेश आहे.
लखमापूर आणि ताहराबाद मंडळामध्ये गहू आणि कांद्याचे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील शनिवारच्या (ता. १८) प्राथमिक अहवालानुसार ६०१.६० हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यात पीकनिहाय क्षेत्र हेक्टरमध्ये असे : कांदा-३५१, कांदा डेंगळे-१४८, गहू-८८.८०, मका-२, ज्वारी-०.४०, चारा-५.६०, भाजीपाला-१.८०. तसेच देवळा तालुक्यात कांद्याचे १३८, कांदा डेंगळेचे १९.५०, डाळिंबाचे ५५, चाऱ्याचे १० असे एकूण २२२.५० हेक्टरचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
निफाडमधील दीड हजार हेक्टर बाधित
निफाड तालुक्यातील ४० गावांमधील ३ हजार ९७ शेतकऱ्यांचे १ हजार ४६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक ५३५ हेक्टरला चांदोरी शिवारात फटका बसला आहे. शिवाय शंभर ते अडीचशे हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या गावांमध्ये कुंभारी, पंचकेश्वर, देवपूर, नांदूरमधमेश्वर, खेडे, नांदुर्डी, वनसगाव, ब्राह्मणगाव या शिवाराचा समावेश आहे.
निफाड तालुक्यात अवकाळी आणि गारपिटीने बाधित झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये याप्रमाणे : द्राक्षे-६८४.३८, गहू-६१८.६२, कांदा-१२९.५, भाजीपाला-३३. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. कांद्याचे १ हजार ५० हेक्टरचे नुकसान झाले असल्याने उत्पादनात घट ठरलेली आहे. त्याखालोखाल १ हजार ३७७ हेक्टर क्षेत्रावरील गव्हाला नुकसानीच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत.
टोमॅटोचे १४, हरभऱ्याचे ४२.५०, भाजीपाल्याचे ३५४.७, इतर फळांचे ४, द्राक्षांचे ७१५, आंब्याचे ९०१, मक्याचे २, डाळिंबाचे ५५, चारा पिकांचे २३८ हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शुक्रवारी (ता. १७) कृषी विभागाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार तालुकानिहाय पिकांचे झालेल्या नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये असे : बागलाण-२८, नांदगाव-२९.१०, कळवण-८३२.३०, दिंडोरी-२७, सुरगाणा-३६.६०, नाशिक-१९.९०, त्र्यंबकेश्वर-४०.२५, पेठ-१३२५.४६, चांदवड-४९८.८०.
संपामुळे नेमक्या स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह
जुन्या पेन्शनसह इतर प्रश्नांवर राज्य सरकार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे अस्त्र उगारलेले आहे. त्यामुळे तालुकास्तरीय कृषी विभागाच्या यंत्रणेला गावस्तरावरील कर्मचाऱ्यांकडून माहिती संकलित करणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून प्राथमिक अहवाल तयार करत तो जिल्हास्तरावर पाठवला जात आहे.
ही सारी परिस्थिती पाहता, अगोदरच नुकसानीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना सरकार कसा दिलासा देणार असा प्रश्न तयार झाला आहे. शिवाय गावस्तरावरील यंत्रणा उपलब्ध नसल्याने धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी, गारपिटीच्या नुकसानीची नेमकी स्थिती पुढे येणार याबद्दलचे प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.