Unseasonal Rain : कातरणी, आडगाव रेपाळ परिसरात पिके उध्वस्त; गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to onion crops due to hailstorm in the northern part of the taluka.

Unseasonal Rain : कातरणी, आडगाव रेपाळ परिसरात पिके उध्वस्त; गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

येवला (जि. नाशिक) : कातरणी, आडगाव रेपाळ, विसापूर, मुरमी, विखरणी, अंकाई, कुसमाडी परिसरात शनिवारी (ता. १८) सायंकाळी व रात्री आलेल्या गारांच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू, द्राक्ष, कांदा, उन्हाळी मका, डोंगळे अवकाळी पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

गारांचा तडाखा व पाणी साचल्याने व वाहिल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. कातरणी येथील हौशा नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले. (Unseasonal Rain Crops destroyed in Katrani Adgaon Repal area Heavy crop damage due to hailstorm nashik news)

गेल्या तीन-चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात ढगाळ वातावरणासह विजेचा कडकडाट व वादळी पाऊस सुरू आहे. रब्बीतील कांदा, गहु, द्राक्ष, भाजीपाला ही पिके भुईसपाट होत आहेत. अजूनही रब्बीतील लाल कांदा आणि गहु ही मुख्य पिके शेतातच आहेत.

त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असून, उन्हाळ कांद्याची पात झोडपल्याने कांदा भुईसपाट झाला आहे. तर, लहान कांद्यावर करपा, किडीचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. सध्याच्या गारा व वादळी पावसाचा परिणाम रब्बीतील उत्पादनावर होणार आहे.

उन्हाळ कांद्यावर मावा, करपा रोगाचा प्रादुर्भाव, तसेच कांदा जमिनीत सडण्याचे प्रमाणही वाढणार आहे. गव्हाचे पीक भुईसपाट होत असून, द्राक्षाला तडे जाऊन सडण्याचे प्रमाण वाढणार आहे. पाऊस जास्त झाल्यास लाल कांदा, उन्हाळ कांदा जमिनीत सडण्याचे प्रमाण वाढणार आहे.

हवामान तज्ज्ञांनी २२ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज दिल्याने द्राक्ष उत्पादक मेटाकुटीस आले आहेत. डाळिंब बागांना गारपिटीचा फटका बसला असून, छाटणी केलेल्या डाळिंब बागांना गारांच्या पावसाने पाने व फुले गळाले आहेत.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

पंचानामे होणार का...

सरकारने नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश दिले असले, तरी शासकीय कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे करणार तरी कोण? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. कांदा बेभाव विकला जात असल्याने सर्वसामान्यांचे सरकार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने प्रति क्विंटल ३५० रूपये मदतीची घोषणा केली.

घोषणा होऊन आठवडा उलटत आला, तरी याबाबतचे आदेश मात्र निघालेले नाहीत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. सरकारने ठोस निर्णय घेऊन संकटात असलेल्या बळीराजाला आधार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.