
Nashik Unseasonal Rain: नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा; बळीराजावर पुन्हा आसमानी संकट
विकास गिते : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गुरुवारी (ता. 16) पहाटेपासून विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावत धुडगूस घातला. जिल्ह्यात निफाड, सिन्नर, इगतपुरी सह अनेक तालुक्यात पावसाने तडाखा दिल्याने बळीराजावर मोठे संकट ओढवले आहे.
मध्य महाराष्ट्र ,मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. बुधवार, गुरुवारी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने शेती पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहेत. काढणीस आलेला गहू, हरभरा ,कांदा पिकांचे बुधवारी व गुरुवारी झालेल्या पावसात मोठे नुकसान झाले असून आंब्याचे या आधीच मोठे नुकसान झाले होते.
आता पुन्हा झाडावर असलेल्या मोहोर पावसामुळे झाडाला आलेल्या लहान कैऱ्या गळून पडलेल्या आहेत. त्यातच गुरुवारी मध्यरात्रीपासून विजांसह पाऊस. त्यात पहाटे ढगाळ वातावरण यामुळे अनेक नागरिकांनी या वातावरणाची धास्ती घेतली आहे. जिल्ह्यात अनेक भागात गहू सोंगणीला आलेला असताना.
हाती आलेला घास. या अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. तर उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली .असून या पावसाचा या कांद्यालाही मोठा फटका बसलेला आहे. गहू, हरभरा, मका, हे सोगणीला आलेले पीक पावसात भिजल्याने खूप मोठे नुकसान झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकड्यांचा वादळ तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकरी राजा शेत जमिनीमध्ये असलेल्या पिकाकडे धाव घेऊन कांदा, गहू हे पीक झाकण्यासाठी धावपळ करत आहे. त्यातच द्राक्ष उत्पादकांमध्ये या गारपिटांनी मोठी चिंता वाढवली आहे.
हाता- तोंडाशी आलेला घास या गारांच्या अवकाळी पावसामुळे जातो की काय अशी स्थिती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. त्यातच ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी उत्पादक मोठ्या चिंतेत असून मागील सहा ते सात महिन्यापूर्वी अवकाळी पावसाने जिल्हाभर थैमान घातल्याने व होत्याचे नव्हते झालेले होते.
शासनाने त्वरित या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी संबंधित विभागाला सूचना देत अवकाळी पावसाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असून मागील पाच-सहा दिवसापूर्वी अवकाळी पाऊस सिन्नर तालुक्यात पडल्याने अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका, द्राक्ष यांचे नुकसान झाल्याने 75 हेक्टरवर नुकसानीचे पंचनामे कृषी ,महसूल या संबंधित विभागाने तालुक्यात केलेले आहे.