Unseasonal Rain Damage : युवा शेतकऱ्याकडून कांद्याला ‘अग्नीडाग’; डांगसौंदाणे येथील घटना | Unseasonal Rain Damage Onion fired by young farmer Incident at Dangsaundane nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogesh Sonwane performing funeral rites on the onion crop.

Unseasonal Rain Damage : युवा शेतकऱ्याकडून कांद्याला ‘अग्नीडाग’; डांगसौंदाणे येथील घटना

Unseasonal Rain Damage : बागलाण तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस, गारपीट, व वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रविवारी (ता.३०) देखील अवकाळी पावसाने तालुक्याला झोडपले.

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे डांगसौंदाणे (ता. बागलाण) येथील युवा शेतकरी योगेश सोनवणे याने शेतात काढून ठेवलेल्या कांद्याला अग्नीडाग देत अंत्यसंस्कार करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. (Unseasonal Rain Damage Onion fired by young farmer Incident at Dangsaundane nashik news)

रविवारी (ता.३०) बागलाण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. याचवेळी डांगसौंदाणे (ता.बागलाण)येथील योगेश सोनवणे या युवा शेतकऱ्याने पंधरा एकर क्षेत्रातील नुकताच काढून ठेवलेला कांदा पावसाने भिजला. यामुळे संतप्त योगेश याने कांद्याचे अंत्यसंस्कार करीत अग्नीडाग देऊन विधिवत क्रियाकर्म केले.

गेल्या १५ दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे काढणी योग्य व खांडून शेतात घोड्या घालून पडलेला कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक वेळा झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीच्या तडाख्यात सापडलेल्या कांदा सडू लागला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

हा कांदा लिलावास आणल्यानंतर कांदा व्यापारी त्या मालाचा पुकारा करण्यास धजावत नाहीत. लिलाव झालाच तर शे- पन्नास रुपये या मातीमोल भावाने विकणे भाग पडत आहे. उत्पादन खर्च तर सोडाच पण ट्रॅक्टर भाड्याची रक्कम सुद्धा त्यातून फिटत नाही. अशा भयावह अवस्थेत शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

"१० एप्रिल रोजी दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील कंरजाडी खोरे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर आले होते. तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासन देऊनही बळिराजाराच्या खात्यात अद्याप दमडी ही पडलेली नाही." - कुबेर जाधव, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.