Unseasonal Rain : इगतपुरीत सलग 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

Unseasonal Rain : इगतपुरीत सलग 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यतील शेतकऱ्यांची अस्मानी संकटांची मालिका अद्यापही सुरूच आहे. सलग तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळीने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे अवसान गळाले असून कंबरडेच मोडले आहे. (Unseasonal rain in Igatpuri for 3 consecutive days crop damage nashik news)

खरीप आणि रब्बी हंगामताही येथील शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट पिच्छा सोडायला तयार नाही. चार-पाच दिवसांपूर्वीही अवकाळीचा शिडकावा आणि शनिवारी (ता. १८) विविध भागांत पहाटेपासूनच बेमोसमी पावसाने आणि विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली.

दरम्यान, अचानक झालेल्या पावसाने इगतपुरी शहरासह घोटी, काळुस्ते, वाघेरे, सोमज गोंदे दुमालासह पूर्व भागातील पिंपळगाव मोरपासून अधरवड, इंदोरे, खडकेद, वासाळी, सोनोशी, अडसरे बुद्रुक, बेलगाव, धामणी, धामणगाव, टाकेद खुर्द, साकूर फाटा, शेणित, निनावी, भरवीर परिसरात हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यात गारवा पसरला आहे. हा पाऊस रब्बीला मारक ठरत आहे.

अवकाळी पावसामुळे लहान-मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकरी वर्गात बागायतीबरोबरच पावसाळ्यात जनावरांसाठी गवत, वैरण काडी साठविण्याचे कामकाज यासोबतच लाकूड फाटा, खत, सामग्री करण्याचे कामकाज सुरू आहे. अशा परिस्थितीत मधेच अवकाळीसारखे अस्मानी संकट हे शेतकऱ्यांच्या मुळावर आल्याने शेतकरीराजा दुहेरी संकटात पडला आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

पूर्व पट्ट्यातील धरणालगत असलेल्या व परिसरातील कायम ओलिताखाली असलेल्या बागायतदार शेतकऱ्यांच्या काकडी, दोडकी, टोमॅटो, वांगी, बटाटे कांदा, मका, वालवड, कोबी, गहू आदी भाजीपाला पिकांसह चारा, उघड्यावर असलेला संसार यांसह वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले. बागायत पिकांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. या अस्मानी संकटामुळे बागायतदार शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार शनिवारी पहाटे सुमारे अर्धा तास काही भागात रिमझिम, तर काही चांगला पाऊस झाला. या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा व पालेभाज्याचे नुकसान झाले.

तालुक्यातील पूर्व व पश्चिम भागातील वाडीवऱ्हे, सांजेगाव, गोंदे दुमाला, मुकणे, पाडळी देशमुख, साकूर, शेणित कवडदरा, धामणगाव, घोटी खुर्द त्रिंगलवाडी, बलायदुरी, भावली, मानवेढे, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, नांदूरवैद्य या गावात शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

येथे शेती मोठी असल्याने येथील शेतकरी वर्ग शेतीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा, गहू, हरभरा, मसूर तसेच पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे पुढील सर्व मनसुबे उधळून लावले आहेत.