Unseasonal Rain : निफाडच्या द्राक्षपंढरीला सलग दुसऱ्या दिवसी अवकाळीचा तडाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unseasonal rain Niphad grapes crops have collapsed nashik news

Unseasonal Rain : निफाडच्या द्राक्षपंढरीला सलग दुसऱ्या दिवसी अवकाळीचा तडाखा

निफाड (जि. नाशिक) : द्राक्षाचा हंगाम ऐनभरात असताना आलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात निफाडची द्राक्षपंढरी कोलमडून गेली आहे. सलग दुसऱ्या दिवसी वादळी वारा आणि पावसाने (unseasonal rain) थैमान घातले आहे. (unseasonal rain Niphad grapes crops have collapsed nashik news)

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, पिंपरी, उगावसह अन्य भागातील द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून अनेक ठिकाणी द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत. द्राक्षाचे लगडलेले घडांसह बाग कोसळलेली पाहताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

दुसरीकडे शेतात उभा असलेला गहू, हरभरा आडवा झाल्याने बळीराजावर दुहेरी संकट कोसळलेले आहे. बाजारपेठेत कांद्यासह, द्राक्ष आदी शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांसमोर आधीच सुलतानी संकट असताना त्यात वादळी पावसाने त्याच्या उरल्यासुरल्या स्वप्नांचाही चक्काचूर झाला आहे.

निफाड, लासलगाव, पिंपळगाव, कसबे सुकेणे, खडक माळेगाव, देवगाव गोदाकाठासह तालुक्यातील द्राक्ष पट्ट्यातील गावांमध्ये दोन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षशेतीची वाट लागली आहे. सध्या २५ हजार हेक्टर क्षेत्राहून अधिक द्राक्षबागांमध्ये मोठ्या प्रमाणात हार्वेस्टिंगची कामे सुरू आहेत.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

त्यात हा पाऊस झाल्याने द्राक्ष बागांचे अंदाजे 40% हून अधिक नुकसान झाले आहे. पोटच्या पोराप्रमाणे मोठ्या कष्टाने निर्यातक्षम द्राक्ष पिकवायची आणि ती निसर्गाने उद्वस्त करायची असा प्रकार गेल्या काही वर्षात सुरू आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर कुऱ्हाडही चालवली आहे. सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे अनेक तयार झालेल्या द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत.

त्यामुळे शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना संकटात हात देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यापुढे गारपीट, अवकाळी पावसापासून द्राक्षबागांना वाचवायचे असेल तर क्रॉप कव्हरिंगचा पायलट प्रोजेक्ट नाशिक जिल्ह्यात राबवायला हवा असे मतेही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

"वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे आमची दोन एकर नानासाहेब पर्पलची बाग जमीनदोस्त झाल्यामुळे १० लाखांचे नुकसान झाले आहे. मायबाप सरकारने झालेल्या नुकसानीची दखल घेऊन तातडीने मदत करावी हीच अपेक्षा आहे." - भाऊसाहेब पानगव्हाणे, उगाव, निफाड.

"गेल्या दोन दिवसापासून कोसळणारा पाऊस आमच्या द्राक्षशेतीला नजर लावणारा ठरला आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या द्राक्षांना गेलेले तडे पाहून मन विषण्ण झाले आहे. झालेले नुकसान मोठे असल्याने आता काय करावे असा यक्षप्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत शासकीय पातळीवर दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करायला हवी" -बाळासाहेब शेळके, नुकसानग्रस्त शेतकरी, निफाड.

टॅग्स :NashikGrapesNiphad