
Nashik News: द्राक्षनगरीचे वेगाने होतेय शहरीकरण; चेहरामोहरा बदलतोय, पण सुयोग्य आराखडा हवा
Nashik News : मुंबईपासुन दिल्ली-आग्रा यासारख्या शहरांना जोडणारा महामार्ग, आशिया खंडात अव्वल बाजार समिती, कृषी निविष्ठांसह इतर व्यापाराची मोठी बाजारपेठ यामुळे पिंपळगांव शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे.
वाढते प्लॉटींग, उंच-उंच इमारती अशी थक्क करणारी शहरकरणाची ‘बुलेट ट्रेन’ सध्या पिंपळगांवने पकडलेली दिसत आहे. मात्र, चौफेर वाढत असलेल्या पिंपळगावमध्ये सुयोग्य शहर विकासाचा आराखडा तयार व्हायला हवा, असे आता बोलले जाऊ लागले आहे. (Urbanization of pimplegaon baswant happening fast Nashik News)
पिंपळगांवची लोकसंख्या ७५ हजारांच्या पुढे गेली आहे. महामार्गामुळे दळण-वळण सुविधा सहज उपलब्ध असल्याने व्यापार उदिम होत आहे. कांदा, टोमॅटोची राजधानी अशी ओळख व निर्यातक्षम द्राक्षांची बाजारपेठ यामुळे येथे बाराही महिने रोजगार असतो.
व्यापारी पेठेमुळे हाताला काम मिळते. दिंडोरी, चांदवड, नाशिक या तालुक्यांच्या सिमा लगत असल्याने नोकरदारही द्राक्षनगरीत वास्तव्याला पसंती देत आहेत. शेतीमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी व परिसरातील ३० गावांच्या नागरिकांची ही बाजारपेठ असल्याने येथे कायम वर्दळ असते.
उंचचउंच इमारती...
पिंपळगांव शहरात सध्या किमान ५० हुन अधिक गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रिअल इस्टेटबाबत महिन्याकाठी किमान शंभर व्यवहार होत असल्याचे दिसते.
टोलेजंग उंच-उंच इमारतींनी पिंपळगांव शहराला व्यापले आहे. सहा कोटी रूपयांची निव्वळ घरपट्टी ग्रामपंचायतीला मिळते. यावरून नागरिकरणाचा अंदाज येतो. पालखेड धरणातील पाणी योजनेमुळे मुलबक पाणी शहराला मिळते.
वीस वर्षांत मोठी झेप
वीस वर्षापुर्वी केवळ निफाड फाटा परिसरापर्यंत मर्यादीत असलेल्या पिंपळगांवने विस्तारात मोठी झेप घेतली. चिंचखेड रोड, उंबरखेड रोड, घोडकेनगर, जोपुळ रोड अशा दोन किलोमीटर परिघात वेगाने नागरी वस्ती वाढत आहे.
या परिसरात एन. ए. प्लाटींग, रो-हाऊस, सदनिकांच्या प्रोजेक्टमध्ये पाहता पाहता बुकींग होत आहे. शहरातील जुन्या वाड्यांच्या जागेवर डौलदार इमारती उभ्या राहात आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
समस्यांच्या महापूराची भिती
पिंपळगांव शहराचा वेग उच्चांकी असताना त्याला नियोजनबद्ध आराखड्याची जोड देण्याची आवश्यकता आता वाटु लागली आहे. उपनगरातील रस्ते, गटारीचे प्रश्न सतावत आहेत. ग्रामपंचायतीची विकासकामे साधताना निधीअभावी दमछाक होत आहे.
मुलभुत सुविधांचे सुयोग्य नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा एकीकडे शहरकरण होत असतांना समस्याचा महापुर येऊ शकतो.
असे आहेत दर
* एनए प्लॉट (प्रतिगुंठा) : दहा ते बारा लाख रूपये
* अपार्टमेंटमधील फ्लॅट : २५ ते ३० हजार रूपये प्रतिचौरस फुट
"पिंपळगांव शहराला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांची पहिली पसंती आहे. घरे बांधण्यासाठी पाण्यासारख्या आवश्यक सुविधा येथे उपलब्ध आहेत. पिंपळगांव शहर महामार्गामुळे मुंबई ते दिल्लीपर्यंत जोडलेले असून, तीन तालुक्यांची कनेक्टिव्हीटी असल्याने नोकरदारांसाठी सोयीचे शहर आहे."-रफिक शेख, शमा बिल्डकॉन, पिंपळगाव बसवंत